ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या साखळीत चारपैकी चार सामने जिंकून अपराजित राहणाऱ्या न्यूझीलंड संघासमोर गुरुवारी होणाऱ्या महिलांच्या उपांत्य लढतीत वेस्ट इंडिजचे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या किवी संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आर्यलड आणि श्रीलंका या संघांना हरवून इथपर्यंत मजल मारली असल्यामुळे विंडीजच्या तुलनेत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. वेस्ट इंडिजचा संघ आयसीसी क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून, त्यांनी साखळीमध्ये चार पैकी तीन सामने जिंकले आहेत.
२००९ आणि २०१०मध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्स, रॅचेल प्रीस्ट आणि सोफी डेव्हिन यांच्यावर मुख्य मदार आहे. लीघ कॅस्पारेकने आतापर्यंत नऊ बळी घेत आपला गोलंदाजीत प्रभाव दाखवला आहे. तिला एरिन बर्मिगहॅम आणि डेव्हिन यांची पूरक साथ मिळत आहे. वेस्ट इंडिजला आशा आहे ती अनुभवी कर्णधार स्टेफनी टेलरकडून. तिने आतापर्यंतच्या चार सामन्यांत १६२ धावा केल्या आहेत. याशिवाय भारताविरुद्धच्या विजयाची शिल्पकार दिएंड्रा डॉटिनच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे
संघ
न्यूझीलंड : सुझी बेट्स (कर्णधार), सोफी डेव्हिन, एरिन बर्मिगहॅम, लीघ कॅस्पारेक, फेलिसिटी लेडॉन-डेव्हिस, सारा मॅक्ग्लॅशन, कॅटी मार्टिन, थॅमसिन न्यूटन, मोर्ना नेल्सन, कॅटी पर्किन्स, अ‍ॅना पीटरसन, रचेल प्रीस्ट, हन्ना रॉवे, अ‍ॅमी सॅटर्थवेट, लीआ तहाहू.
वेस्ट इंडिज : स्टेफनी टेलर (कर्णधार), शकीरा सेलमन, मरिस्सा एग्युलेरिया, शेमॅने कॅम्पबेले, शमिलिया कॉनेल, ब्रिटनी कूपर, दिएंड्रा डॉटिन, एफी फ्लेचर, स्टॅसी अ‍ॅन-किंग, कायसिया नाइट, हेले मॅथ्यूज, अनिसा मोहम्मद, शकुआना क्विंटीने, ट्रीमेने स्मार्ट.

सामन्याची वेळ : दुपारी २.३० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्याचे लक्ष्य – टेलर
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत तीन वेळा उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात आलेले अपयश यंदाच्या स्पध्रेत पुसून टाकण्याचा निर्धार वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलरने व्यक्त केला आहे. ‘‘यापूर्वी तीन वेळा आम्ही उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आम्हाला पराभव पत्करावा लागला. यावेळी हा अडथळा पार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. सुदैवाने यावेळी आमच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान नाही,’’ असे टेलर म्हणाली.