पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर सारेच भारतीय क्रिकेट आनंदात आहे. एकवेळ विश्वचषक नाही जिंकला तरी बेहत्तर; पण पाकिस्तानला जिंकू देऊ नका, अशी मानसिकता क्रिकेटला धर्म मानणाऱ्या काही भारतीयांची नक्कीच आहे. पाकिस्तानला हरवले, यातच सारे काही मिळाले, अशी सर्वाची भावना होती. पण या विजयानंतरही काही गोष्टी भविष्याच्या दृष्टीने विचार करायला लावणाऱ्या आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांचा फॉर्म हा संघाच्या चिंतेचा विषय आहे. हे तिघे झटपट बाद होऊन संघाची दैना उडवताना दिसतात. त्यानंतर विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी चांगले खेळले तर विजयाची चव चाखायला मिळते, अन्यथा न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसारखा पराभव पदरी पडतो.
सलामीवीर विजयाचा पाया रचत असतो, असे म्हटले जाते. पण इथे दोन्हीही सलामीवीरांना जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहणे अवघड जाते आहे. विश्वचषकातील दोन्ही सामन्यांत हीच गोष्ट प्रकर्षांने जाणवली. रोहित हा गुणवान खेळाडू आहे, त्याच्यासारखे फटके कुणाकडे नाहीत, असे म्हटले जाते. पण खेळपट्टीवर उभी राहायची मानसिकता असल्यावर तुम्ही फटके मारू शकता, हे तेवढेच खरे. सध्या रोहित हा निष्काळजी वाटतो. धवनचे पदलालित्यच बरेच काही सांगू जाते आणि त्याच चक्रव्यूहात तो अडकतो. सातत्य हा प्रकार या दोघांकडेही दिसत नाही. हे दोघेही एखादी मोठी खेळी साकारून त्यानंतर संघातील स्थान शाबूत ठेवण्यात माहीर असल्याचे दिसून येते. या दोघांपैकी एकाला वगळून अजिंक्य रहाणेला संधी का दिली जात नाही, हे अनाकलनीय आहे. तांत्रिकदृटय़ा अजिंक्य सक्षम आहे, ट्वेन्टी-२० प्रकारात त्याने स्वत:ला सिद्धही केले आहे. क्रिकेटचा गंभीरतेने विचारही तो करताना दिसतो, पण तरीही संघाबाहेर आहे, याचेच नवल वाटते. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याबाबत काय विचार करतो, हे तोच जाणे. सुरेश रैना एकेकाळचा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज समजला जायचा, पण त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत. धोनी त्याचा वापर फलंदाजापेक्षा फिरकीपटू म्हणूनच जास्त करतो. विराट कोहलीही त्यांच्याच पंक्तीतला. पण तो ज्या जबाबदारीने खेळतो, ते या तिघांनी पाहायला हवे. त्याची खेळण्याची मानसिकता, मोठी खेळी साकारण्याचे प्रयत्न, खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार खेळात त्याने केलेले बदल, सारेच या त्रिमूर्तीनी शिकण्यासारखे आहे. महेंद्रसिंग धोनी हा काही तंत्रशुद्ध फलंदाज नाही, हे तोदेखील मान्य करतो. पण कोणत्याही खेळपट्टीवर पाय रोवून खेळण्याचे कसब त्याच्याकडे आहे. युवराज सिंग हा पूर्वीसारखा नक्कीच भासत नाही. पण त्याच्याकडे असलेली जिगर त्याला मैदानावर धावा करण्यासाठी प्रेरणा देते. त्याची फलंदाजी पूर्वीसारखी होत नसली तरी धवन, रोहित आणि रैनापेक्षा तरी तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
रवींद्र जडेजाला अष्टपैलू, हे बिरुद कुणी लावले ते कळत नाही. जडेजा गोलंदाजी चोख करत असला तरी जबाबदारीने फलंदाजी करताना तो अपवादात्मक दिसतो. जडेजापेक्षा आर. अश्विन चांगली फलंदाजी करतो, हे पाहायला मिळाले आहे. हार्दिक पंडय़ामध्ये गुणवत्ता कमी आणि उत्साहच जास्त असल्याचे जाणवते. आतापर्यंत त्याचे फलंदाजीतले योगदान जवळपास नगण्यच.
पूर्वी भारतीय फलंदाजी म्हणजे सचिन तेंडुलकर, असे समजले जायचे. आता कोहलीबाबत तेच होताना दिसत आहे. धोनी शेवटच्या षटकांमध्ये येऊन फटक्यांचे इमले बांधून जातो, हाच काय तो फरक. संघाची फलंदाजी एका व्यक्तीवर केंद्रित असणे, हे चांगल्या संघाचे लक्षण नाही. जर कोहली आणि धोनी यांच्याकडून एखाद्या सामन्यात चांगली कामगिरी झाली नाही तर पराभव अटळ, असे म्हटले जात आहे. त्यामुळे रोहित, धवन आणि रैना यांनी आपल्या फलंदाजीचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. अजूनही वेळ निघून गेलेली नाही. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया आपल्यासमोर उभे ठाकणार आहेत. त्यांच्यासमोर खेळताना कोहली आणि धोनी यांच्यावरचे दडपण थोडे हलके करत जबाबदारी घ्या. नाहीतर पराभवानंतर पहिले टीकेचे धनी तुम्हीच ठरणार आहात.
अजिंक्यचा कसून सराव
अजिंक्य रहाणेने सोमवारी एम. चिन्नास्वामी मैदानात दोन तास कसून सराव केला. यावेळी अजिंक्यबरोबर भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर होते. भारताचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरल्यावर तिसऱ्या सामन्यात अजिंक्यला संधी मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.