ख्रिस गेलच्या कौशल्याचा दर्जा सर्वोत्तम आहे, असे मत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने व्यक्त केले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गेलने इंग्लंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने ११ षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडून ४८ चेंडूंत नाबाद १०० धावा चोपल्या.
‘‘वानखेडेवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत गेलने दमदार खेळ केला. आम्ही कौशल्याचा योग्य वापर केला असता, तर आम्हीही चांगली कामगिरी करू शकलो असतो, परंतु गेलला संधी मिळाल्यास तो कुणालाच संधी देत नाही,’’ असे मॉर्गनने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘आमच्या गोलंदाजांना दर्जेदार खेळ करण्यात अपयश आले. सुरुवातीला आमच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केला. गेलला रोखण्याच्या अनेक योजना आखल्या होत्या, परंतु त्याला रोखणे कठीण आहे.’’