भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मुलभूत चूका केल्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेचा पहिला सामना सुरू होण्याआधीपासूनच मी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले होते. उपांत्य फेरी गाठल्यानंतर भारतच विश्वचषक जिंकेल असे मला वाटत होते. मात्र, वानखेडेवर भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय फलंदाजांनी चांगल्या धावा देखील कुटल्या पण दुसऱया डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या मुलभूत चुकांमुळे यजमानांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. ते दोन नो बॉल भारताला चांगलेच महागात पडले.

याशिवाय, वॉर्नने विराट कोहलीचे तोंडभरुन कौतुक देखील केले. विराटने वानखेडेवर अप्रतिम खेळी साकारली. ट्वेन्टी-२० प्रकारात विराट हा माझ्यासाठी जगातील तिसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे वॉर्न म्हणाला.
१९२ धावसंख्या नक्कीच आव्हानात्मक होती. त्यात ख्रिस गेल स्वस्तात बाद झाल्यानंतर भारतच जिंकणार असे वाटत होते. पण वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे कौतुक करायला हवे. त्यांनी सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश केला, असेही तो पुढे म्हणाला.