आसिफची निर्णायक फटकेबाजी

दुबई : कर्णधार बाबर आझमच्या (५१) अर्धशतकानंतर आसिफ अलीने (नाबाद २५) एकाच षटकात मारलेल्या चार षटकारांमुळे पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला. हा पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला.

अफगाणिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत गाठले. त्यामुळे त्यांनी उपांत्य फेरी गाठण्यासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली. या सामन्यात मोहम्मद रिझवान (८) लवकर बाद झाला. मात्र, आझम आणि फखर झमान (३०) यांनी पाकिस्तानला सावरले. या दोघांनी ६३ धावांची भागीदारी रचल्यावर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने झमानचा अडसर दूर केला. तर रशीद खानने मोहम्मद हाफिज (१०) आणि आझम यांना माघारी पाठवले. परंतु आसिफ आणि शोएब मलिक (१९) यांनी मोठे फटके मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

त्याआधी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४७ अशी धावसंख्या केली. पाच गडी ६४ धावांत गमावल्यानंतर नजीबुल्ला झादरानने (२२) चांगली फलंदाजी केली. मग कर्णधार नबी (नाबाद ३५) आणि गुलबदिन नैब (नाबाद ३५) यांनी ७१ धावांची भागीदारी रचल्याने अफगाणिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १४७ (मोहम्मद नबी नाबाद ३५, गुलबदिन नैब नाबाद ३५; इमाद वसीम २/२५) पराभूत वि. पाकिस्तान : १९ षटकांत ५ बाद १४८ (बाबर आझम ५१, फखर झमान ३०; रशीद खान २/२६)

सामनावीर : आसिफ अली

’ गुण : पाकिस्तान २, अफगाणिस्तान ०