श्रीलंकेवर आठ विकेट्स राखून विजय
हाशिम अमलाचे अर्धशतक आणि फॅफ डू प्लेसिस व एबी डी’व्हिलियर्सच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत श्रीलंकेवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचे आव्हान लढतीआधीच संपुष्टात आले होते. केवळ औपचारिकता म्हणून खेळविण्यात आलेल्या सामन्यात आफ्रिकेने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडीवर सुरेख खेळ केला. १२१ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने ८ विकेट्स व १४ चेंडू राखून पूर्ण केले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने विजयी निरोप घेण्यासाठी प्रयत्न केले. दिनेश चंडीमल आणि तिलकरत्ने दिलशान या जोडीने संघाला दमदार सलामी दिली. मात्र, हे दोघेही माघारी परतल्यानंतर मधल्या फळीने निराशा केली आणि मजबूत स्थितीत असलेला श्रीलंकेचा संघ १२० धावांतच गारद झाला. दिलशानने सर्वाधिक ३६ धावा केल्या. आफ्रिकेकडून कायले अबॉट, अ‍ॅरोन फंगिसो आणि फरहान बेहराडीन यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. १२१धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात झटका बसूनही आफ्रिकेने विजय साकारला. अमला आणि प्लेसिस जोडीने संघासाठी विजयी पाया रचला. त्यावर डी’व्हिलियर्सने विजयी मोहोर उमटवली. अमलाने ५२ चेंडूंत ५ चौकार व एक षटकार टोलवून नाबाद ५६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : १९.३ षटकांत सर्वबाद १२० (दिनेश चंडिमल २१, तिलकरत्ने दिलशान ३६; कायले अबॉट २-१४, अ‍ॅरोन फंगिसो २-२६, फरहान बेहराडीन २-१५) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १७.४ षटकांत २ बाद १२२ (हाशिम अमला नाबाद ५६, फॅफ डू प्लेसिस ३१, एबी डी,व्हिलियर्स नाबाद २०; सुरंगा लकमल १-२८).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: South africa beat sri lanka by 8 wickets in icc world t20
First published on: 29-03-2016 at 06:39 IST