राजपक्षेचे अर्धशतकी योगदान

शारजा : डावखुऱ्या चरिथ असलंकाच्या (नाबाद ८०) उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात बांगलादेशवर पाच गडी आणि सात चेंडू राखून मात केली.

शारजा येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने दिलेले १७२ धावांचे आव्हान श्रीलंकेने १८.५ षटकांत पूर्ण केले. डावखुरा फिरकीपटू नासूम अहमदने पहिल्याच षटकात अनुभवी सलामीवीर कुसाल परेराचा (१) त्रिफळा उडवला. पाथुम निसंका (२४) आणि असलंका यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ६९ धावांची भागीदारी रचत श्रीलंकेचा डाव सावरला. मात्र, बांगलादेशचा सर्वोत्तम फिरकीपटू शाकिब अल हसनने एकाच षटकात निसंका आणि अविष्का फर्नांडो (०) यांना बाद करत श्रीलंकेला अडचणीत टाकले. वानिंदू हसरंगाही (६) पुढील षटकात माघारी परतला. त्यामुळे श्रीलंकेची १ बाद ७१ वरून ४ बाद ७९ अशी अवस्था झाली. पण असलंका आणि भानुका राजपक्षे (५३) यांनी ८६ धावांची निर्णायक भागीदारी रचल्याने श्रीलंकेने विजय मिळवला. असलंकाने ४९ चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. राजपक्षेने प्रत्येकी तीन चौकार-षटकार लगावताना ३१ चेंडूंतच अर्धशतकी खेळी साकारली. या विजयासह श्रीलंकेने पहिल्या गटात दुसरे स्थान मिळवले.

तत्पूर्वी, बांगलादेशने २० षटकांत ४ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली. मोहम्मद नईम (६२) आणि लिटन दास (१६) यांनी सलामी दिली. मात्र, लिटन दास (१६) आणि शाकिब (१०) झटपट माघारी परतल्याने बांगलादेशचा संघ अडचणीत सापडला. एक बाजू लावून धरलेल्या नईमला अनुभवी मुशफिकूर रहीमची (नाबाद ५७) चांगली साथ लाभली. नईम बाद झाल्यावर रहीम आणि कर्णधार महमुदुल्लाह (नाबाद १०) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने बांगलादेशने १७० धावांचा टप्पा ओलांडला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : २० षटकांत ४ बाद १७१ (मोहम्मद नईम ६२, मुशफिकूर रहीम नाबाद ५७; चमिका करुणरत्ने १/१२) पराभूत वि. श्रीलंका : १८.५ षटकांत ५ बाद १७२ (चरिथ असलंका नाबाद ८०, भानुका राजपक्षे ५३; शाकिब अल हसन २/१७)

सामनावीर : चरिथ असलंका

’ गुण : श्रीलंका २, बांगलादेश ०

चरिथ असलंकाने या सामन्यात नाबाद ८० धावांची खेळी केली. श्रीलंकेच्या फलंदाजाने बांगलादेशविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यात केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

चरिथ असलंका

८०*

चेंडू     ४९

चौकार  ५ षटकार  ५