ChatGPT 5 Launch: ओपनएआयने गुरुवारी रात्री त्यांचे एआय मॉडेल चॅटजीपीटीचे पाचवे व्हर्जन अर्थात जीपीटी-५ लाँच केले. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की, जीपीटी ५ द्वारे वापरकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांप्रमाणे उत्तरे दिली जातील. जीपीटी-५ हे नवे व्हर्जन अचूकता, वेग, तर्क आणि गणितीय क्षमतांमध्ये प्रगत असे असेल. तसेच लाँचिंग दरम्यान सॅम ऑल्टमन यांनी भारताचाही उल्लेख केला. भारत जागतिक स्तरावर एआयची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकेल, असे त्यांनी म्हटले.
दोन वर्षांपूर्वी जीपीटी-४ लाँच करण्यात आले होते. ओपनएआयच्या माहितीनुसार, जीपीटी-५ हे पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट, वेगवान आणि अधिक उपयुक्त असेल.
लाँचिंगनतर माध्यमांना माहिती देताना सॅम ऑल्टमन म्हणाले, भारत ही वेगाने वाढत जाणारी मोठी बाजारपेठ आहे. भारतातील लोक आणि व्यवसाय वेगाने एआच तंत्रज्ञान स्वीकारत आहेत. अमेरिकेनंतर भारत ही आमची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण भारतातील एआय वापरकर्ते त्याचा वापर कसा करतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
कोडिंग आणि ॲग्नेटिक टास्कसाठी जीपीटी-५ हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात चांगले मॉडेल असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. डेव्हलपर्सना चांगल्या पद्धतीने वापरता यावे, यासाठी जीपीटी-५, जीपीटी ५ मिनी आणि जीपीटी ५ नॅनो असे तीन वेगवेगळे प्रकार लाँच करण्यात आले आहेत. त्यांची कामगिरी, किंमत आणि वेग वेगवेगळा आहे.
सॅम ऑल्टमन पुढे म्हणाले की, जीपीटी ५ हे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील मोठी झेप आहे. जीपीटी ५ ला तुम्ही काहीही प्रश्न विचारले तर त्यातून मिळणारे उत्तर हे एखाद्या तज्ज्ञाने दिल्यासारखे वाटेल. आम्ही वापरकर्त्यांना सुरुवातीला ही सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहोत.