scorecardresearch

५० Miss Calls च्या माध्यमातून घातला ५० लाखांचा गंडा! OTP ला चकवा देत बँकेतून ९५ मिनिटांत ५० लाख ‘गायब’

Cyber Crime: फोन कॉलच्या माध्यमातून दिल्लीत या वर्षी झालेली ही सर्वात मोठी फसवणूक

५० Miss Calls च्या माध्यमातून घातला ५० लाखांचा गंडा! OTP ला चकवा देत बँकेतून ९५ मिनिटांत ५० लाख ‘गायब’
या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावले आहेत (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम, पिक्साबेवरुन साभार)

सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या कंपनीच्या निर्देशकाला ५० लाखांचा ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे हा गंडा केवळ मीस कॉल आणि ब्लॅक कॉलच्या मदतीने घालण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने ओटीपीही शेअर केला नव्हता अशी माहिती समोर येत आहे.

ज्या व्यक्तीची फसवणूक झाली त्याला दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सात ते रात्री पावणेनऊ दरम्यान एकापाठोपाठ एक अनेक कॉल्स आले. यापैकी सुरुवातीचे काही कॉल या व्यक्तीने उचलले. मात्र नंतर समोरुन कोणीच काही बोलत नसल्याने त्याने पुढील कॉल उचलले नाही. त्यानंतर या व्यक्तीने आपला फोन तपासून पाहिला तेव्हा त्याला आरटीजीएसच्या माध्यमातून खात्यातून ५० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं नोटीफिकेशन दिसलं, असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

प्राथमिक चौकशीदरम्यान यापैकी १२ लाख रुपये भास्कर मंडल नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आलेत. तर चार लाख ६० हजार रुपये अवजित गिरी नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर वळते झाले आहेत. त्याचप्रमाणे दोन १०-१० लाखांचे व्यवहार अन्य अनोळखी खात्यावर झाले आहेत. याचप्रमाणे इतर छोट्या रकमेचेही अनेक ट्रान्सफर या ९५ मिनिटांमध्ये झालेत. या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार झारखंडमधील जमात्रा येथूनच हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. ज्या खात्यांवर पैसे वळते झाले आहेत त्यांना या प्रकरणाची माहितीही नसावी असाही अंदाज आहे. या खातेधारकांनी काही कारणानिमित्त आपल्या खात्यांची माहिती या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला दिली असणार आणि त्यामधून हे पैसे तात्पुरते वळते करुन नंतर पुढे दुसऱ्या खात्यांवर पाठवण्यात आले असतील असाही अंदाज आहे.

यंदाच्या वर्षी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फोन कॉलच्या माध्यमातून झालेली ही सर्वात मोठी फसवणूक असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. सामान्यपणे छोट्या रक्कमेची फसवणूक या माध्यमातून केली जाते कारण बँकांच्या व्यवहारांवर मर्यादा असते. मात्र या प्रकरणामध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तीचं करंट अकाऊंट होतं त्यामुळे मोठ्या रक्कमेचा डल्ला सायबर चोरांनी मारला. मात्र केवळ कॉलच्या आधारे एवढ्या मोठा डल्ला मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सायबर चोरांनी ‘सिम स्वॅप’ तंत्रज्ञानाचा वापर करुन ही चोरी केली असावी. यामध्ये टू-स्टेप ऑथेंटिकेशनपद्धतीमधील दोषांचा वापर सायबर चोर करतात. सामान्यपणे अशापद्धतीमध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशमधील मेसेज अथवा कॉलमध्ये तांत्रिक दृष्ट्या ताबा मिळवून चोरी केली जाते. म्हणजे ज्याचं खातं आहे त्याला केवळ फोन किंवा मसेजे येतो मात्र व्यवहारांवर त्याचं नियंत्रण नसतं.

फोन हॅक करुन पॅरलल लाइवर ओटीपी ऐकून त्याचा वापर या चोरीसाठी करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांनी फेटाळलेली नाही. अगदी फोन हँकिंगपासून इतरही दृष्टीने तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या