फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅपची पॅरेंट कंपनी असणाऱ्या Meta मध्ये कर्मचारी कपातीचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की मेटा लवकरच पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची दुसरी फेरी सुरू करणार आहे आणि १०,००० लोकांना कामावरून काढून टाकणार आहे. याची सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.

याच्याशी संबंधित काही लोक म्हणतात की मेटाने कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सुरुवातीला १,५०० कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. यामध्ये रिक्रुटिंग आणि HR (ह्युमन रिसोर्स) या विभागांमधील १,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. या संबंधीचे वृत्त बिझनेस स्टॅंडर्ड या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह एक मिटिंग घेतली होती. या मीटिंगमध्ये झुकरबर्ग म्हणाले की, ”कर्मचारी कपात आणि पुनर्रचनेशी संबंधित ही परिस्थिती पुढील अनेक वर्षे अशीच राहू शकते.” काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्ग यांनी आम्ही आमच्या टीमची संख्या १०,००० ने कमी करणार आहोत. यासोबतच ज्यांच्यासाठी आजवर भरती करण्यात आलेली नाही, अशी ५ हजार पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होते. यासोबतच कंपनीच्या या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांना अद्याप माहिती देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदाहरणार्थ, इंजिनिअरिंग विभागातील कर्मचारी कपात एप्रिलमध्ये होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने ११ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता, जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १३ टक्के इतके होते. नोव्हेंबरमधील कर्मचारी कपात ही प्रत्येकाच्या कामगिरीवर करण्यात आली होती. मात्र आता आर्थिक परिस्थिती आणि उत्पादनाशी संबंधित प्राथमिकता लक्षात घेऊन कपात करण्यात येत असल्याचे झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मेटाच्या प्रवक्त्याने कर्मचारी कपातीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.