3D Model viral photo trend: सोशल मीडियावर सध्या 3D डिजिटल फोटोंचा एक नवीन ट्रेंड व्हायरल होत आहे. हा ट्रेंड युजर्ससाठी एक नवीन आकर्षण ठरत आहे. गुगलच्या नवीन एआय वैशिष्ट्याचा वापर करून तयार केलेले हे फोटो खूपच खरेखुरे असल्यासारखे दिसतात. राजकारण्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या नवीन एआय टूलचा वापर करताना दिसत आहे. यामुळे युजर्सना स्वत:च्या किंवा कुठल्याही रिअल फोटोची 3D इमेज तयार करणं शक्य आहे. मार्चमध्ये जीपीटी-४o लाँच झाल्यानंतर गिब्ली इमेजेस व्हायरल झाल्या होत्या, आता गुगलच्या नॅनो बनाना ज्याला जेमिनाय २.५ फ्लॅश इमेज देखील म्हटले जाते त्या सध्या व्हायरल होत आहेत.
हे एआय टूल काही सेकंदातच कोणताही फोटो सर्व बारकाव्यांसह 3D मॉडेलमध्ये बदलू शकतो. सध्या तरी हे टूल मोफत आहे आणि त्याचे काही फिचर्स लिमिटेड आहेत. यामुळे अगदी सहज कोणीही काही क्षणांत 3D इमेज तयार करू शकतात. यामध्ये अगदी बारीक गोष्टीदेखील सहज कॅप्चर केल्या जातात. चेहऱ्यावरचे हावभाव, कपडे आणि अगदी बॅकग्राउंडसुद्धा. यासाठी तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही.
हे 3D मॉडेल मोफत कसे तयार करावे?
- गुगलच्या एआय स्टुडिओच्या वेबसाईटवर जा. https://aistudio.google.com/prompts/new_chat?model=gemini-2.5-flash-image-preview
- या साईटच्या होमपेजवर नॅनो बनाना वापरून पहा हा पर्याय निवडा
- जेमिनाय २.५ फ्लॅश इमेज उघडण्यासाठी त्या पर्यायावर क्लिक करा
- जर तुम्हाला एआय जनरेटेड काही हवे असेल तर तुमच्या आवडीचा कोणताही प्रॉम्प्ट एंटर करा
- कस्टमाइज्ड इमेजसाठी प्लस बटणावर क्लिक करा आणि तुमची प्रतिमा त्यात द्या
- मूर्ती तयार करण्यासाठी 3D मॉडेल प्रॉम्प्ट टाका
- मग फायनल रिझल्टसाठी क्लिक करा, डाउनलोड करा आणि शेअर करा
त्यानंतर एका लाकडी बेसवर तुम्ही टाकलेल्या फोटोची 3D इमेज दिसेल. हा फोटो अशाप्रकारे तयार होतो की जणू आपण एखाद्या डेस्कवर तयार केलेली प्रतिमा ठेवून फोटो काढला आहे.
या ट्रेंडची भुरळ सामान्यांसह राजकारणी, सेलिब्रिटी यांनाही पडली आहे. “माझ्या तरूण मित्रांनी मला या ट्रेंडची माहिती दिली आणि तो वापरण्याचा सल्ला दिला”, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. त्यांनी त्यांची 3D इमेज त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली. काही जण त्यांचे पाळीव प्राणी, मित्र, गणेशोत्सवातील फोटो अशा 3D इमेज पोस्ट करत आहेत.
अभिनेता इमरान हाश्मीच्या एका फॅनपेजवरून इमरानची 3D इमेज पोस्ट करण्यात आली आहे. तसंच विराट कोहलीच्या एका फॅनपेजवरही त्याची 3D इमेज पोस्ट केली आहे.