आपल्याकडे व्हॉट्स अ‍ॅपचा बोलबाला अलीकडे झाला असला तरी प्रगत देशात ते आधीपासूनच आहे. व्हॉट्स अ‍ॅप हे संदेशवहनाचे एक साधन आहे. स्मार्टफोनच्या मदतीने चटकन संदेश पाठवण्याची सोय त्यात आहे. यात व्हिडिओ, छायाचित्रे, ध्वनिफीत असे सगळ्या स्वरूपात संदेश पाठवता येतात. अँड्रॉइड, ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, आयओएस, सेरीज ४०, सिम्बियन (एस ६०) व विंडोज फोन व नोकिया मध्ये त्याचा वापर करता येतो. व्हॉट्स अ‍ॅप इनकार्पोरेशनची स्थापना २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन व जॅन कॉम यांनी केली. दोघेही याहू कंपनीत काम करीत होते. त्यानंतर त्यांनी ही नवी कंपनी सुरू केली. लाइन, ककावटॉक, वुई चॅट या अशाच प्रकारच्या आशियायी सेवांना व्हॉटस अ‍ॅपने मोठी टक्कर दिली. व्हॉटस अ‍ॅप सध्या दिवसाला १० अब्ज संदेश हाताळत आहे. ही आकडेवारी ऑगस्ट २०१२ मधली आहे. आता ही संख्या आणखी जास्त आहे. फायनान्शियल टाइम्सने या सेवेबाबत असे म्हटले होते की, स्काइपने लँडलाइन इंटरनॅशनल कॉलमध्ये जी क्रांती घडवली तीच क्रांती व्हॉटस अ‍ॅपने मोबाईल एसएमएस सुविधेत घडवली आहे. व्हॉटस अ‍ॅप सेवेत वापरकर्त्यांच्या फोन नंबरचा वापर करून एक युजर अकाउंट तयार केले जाते. त्यात ‘फोननंबर अ‍ॅट दी रेट एस डॉट व्हॉटस अ‍ॅप डॉट नेट’ असे यूजरनेम तयार होते. यात व्हॉटस अ‍ॅप सॉफ्टवेअर तुमच्या फोनमधील पत्ते पुस्तिका त्यांच्या मध्यवर्ती माहिती केंद्रातील माहितीशी ताडून पाहते व आपोआप व्हॉट्स अ‍ॅप यादीत संपर्क व्यक्ती वाढत जातात. यात बहुमाध्यम म्हणजे मल्टीमीडिया संदेशही पाठवता येतात. त्यासाठी प्रतिमा, ध्वनिचित्रफीत हे एचटीटीपी सव्‍‌र्हरकडे पाठवले जाते व नंतर बेस ६४ संकेतावलीत संदेश तयार करून तो पाठवला जातो. यात व्हॉट अ‍ॅपस मेसेंजर हा तुमचा इंटरनेट डाटा प्लान वापरत असल्याने संदेश पाठवण्याचे वेगळे पैसे पडत नाहीत. फुकटात सगळी मित्रमंडळी एकमेकांच्या संपर्कात राहतात. यात समूह स्थापित कून एकमेकांना अमर्याद संदेश पाठवता येतात. या सगळ्या प्रयोगाबाबत ब्रायन व जॅन यांनी असे म्हटले आहे की, याहूत असताना आम्ही जाहिरातींसाठी फार परिश्रम करीत होतो. आम्ही जाहिराती विकत होतो. कालांतराने त्याचा अतिरेक झाला व गुगलला त्याचा फायदा मिळाला. आजकाल कंपन्यांना तुमच्याविषयी तुम्हाला नसेल एवढी माहिती असते, जाहिराती  देताना ते त्याचा वापर करीत असतात. आम्ही जेव्हा व्हॉट्स अ‍ॅप सुरू केले तेव्हा आम्हाला दुसरे जाहिरात केंद्र सुरू करायचे नव्हते. लोकांना सेवा द्यायची होती, त्यांचे पैसे वाचवायचे होते व त्यांचे जीवन समृद्ध करायचे होते, असे ब्रायन व जॅन सांगतात. उद्या आपल्याला कुठली जाहिरात पाहायला मिळणार आहे किंवा आज आपण कुठल्या जाहिराती पाहिल्या याचा विचार रात्री झोपताना आपल्या मनात येत नाही. पण आज आपण कुठल्या मित्राशी संपर्कात होतो, कुणाशी संपर्क करायचा राहिला हे मात्र लक्षात ठेवतो. त्यामुळे आम्ही या संदेश सेवेचा वापर जाहिरातबाजीसाठी केला नाही. जाहिरात हा संज्ञापनाच्या सौंदर्यात बाधा आणणारा घटक आहे, विचाराची साखळी त्यामुळे तुटते. जाहिरातींना आलेल्या महत्त्वामुळे प्रत्येक कंपनीत अगदी उच्चशिक्षित लोक माहितीचे खाणकाम करीत असतात व त्याच्या आधारे जाहिरात तयार केली जाते व ती तुमच्या मोबाईलवर किंवा ब्राउजरवर झळकते. व्हॉटस अ‍ॅपचे इंजिनियर्स माहिती गोळा करण्यात वेळ घालवत नाहीत, ते प्रणालीतील दोष काढून टाकतात. सेवेत सुधारणा कशा करता येतील याचा विचार करतात. तुमची व्यक्तिगत माहिती वापरली जात नाही.