बाजारात नवनवीन स्मार्टफोन इतक्या वेगाने दाखल होत आहेत, की काल-परवा घेतलेला आपला स्मार्टफोनही आपल्याला जुना वाटायला लागतो. आणि आपलाही स्मार्टफोन अधिक स्मार्ट व्हावा, असे वाटू लागते. नव्या स्मार्टफोनची हार्डवेअर क्षमता, अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम, जास्त मेमरी या गोष्टी आपल्या फोनमध्ये निर्माण करणे शक्य नसते. मात्र, आपल्या फोनचा ‘लूक’ बदलून तो पुन्हा एकदा नवा करणं आपल्याला सहज शक्य असतं. तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा लूक बदलण्यासाठी या काही सोप्या टिप्स..

बाह्य़रूप
तुमचा स्मार्टफोन तुम्हाला नवीन करायचा असेल तर सर्वात प्रथम त्याचं बाह्य़रूप बदलावं लागेल. याबाबत नव्याने सांगण्याची गरज नाही. पूर्वी नोकिया ३३१० किंवा २१०० हे त्या काळातील आघाडीचे फोन वापरात होते, तेव्हाही त्यांचे विविध रंगातील, डिझाइनमधील ‘बॉडीकव्हर’ उपलब्ध होते. तसंच आता कोणत्याही स्मार्टफोनचे ‘कस्टमाइज्ड’ बॉडीकव्हर उपलब्ध आहेत. तुमच्या ठिकाणच्या कोणत्याही मोबाइल शॉपीमध्ये गेलात की तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनला व्यवस्थित बसतील अशी आकर्षक कव्हर्स सहज मिळतील. यातील काही स्मार्टफोन कंपन्यांनी निर्माण केलेली असतात (त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते) तर अन्य कंपन्यांनी बनवलेली कव्हर्सही उपलब्ध असतात. यातून तुमच्या आवडीचे कव्हर तुम्ही निवडू शकता.
स्मार्टफोनचे बाह्य़रूप बदलण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ‘केस कव्हर’. आता प्रत्येक स्मार्टफोनला ‘फ्लिप कव्हर’ उपलब्ध आहे. सुरुवातीला कंपन्यांकडून मिळणारे कव्हर्स साधे पण मजबूत असतात. परंतु, मोबाइलच्या दुकानांतून किंवा ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून तुम्ही आकर्षक केस कव्हर खरेदी करू शकता. ‘केस’मुळे तुमच्या फोनचा लूक बदलतोच, पण त्याचबरोबर स्मार्टफोन पडणे किंवा त्याला पाणी वा धूळ लागून तो खराब होणे या गोष्टीही टाळता येतात. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचं ‘लाइफ’ही तुम्हाला वाढवता येतं.

अंतर्गत ‘मेकओव्हर’
स्मार्टफोनचे बाह्य़रूप बदलून त्याचे सौंदर्य वाढवता येते. पण वॉलपेपर, थिम, विजेट अशा युजर इंटरफेसशी संबंधित गोष्टी बदलून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा अंतर्गत मेकओव्हरही सहज करू शकता. विशेषत: तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ‘स्काय इज द लिमिट’. तुमच्या अँड्राइड फोनला तुम्ही हरप्रकारे नवीन रूप देऊ शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला असंख्य अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. ‘लाँचर’ या नावाखाली अनेक अ‍ॅप्स सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मेनूपासून वॉलपेपपर्यंत आणि डिस्प्ले थिमपासून बटणांच्या आकारापर्यंत सर्व गोष्टी बदलू शकता. अशा काही ‘लाँचर’ अ‍ॅप्लिकेशन्सबाबत :

अ‍ॅपेक्स लाँचर
या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमची होम स्क्रीन नऊ प्रकारे बदलू शकता. तसेच तुम्हाला नको असलेले स्मार्टफोनच्या होम स्क्रीनवरील सर्चबार किंवा स्टेटस बार अशा गोष्टी तुम्हाला लपवून ठेवता येतात. अ‍ॅपेक्स लाँचर तुमच्या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्सची नाव, तारीख, आकार या पद्धतीने उतरंड रचू शकतो.
हे लक्षात ठेवा – लाँचर थिम्स या तुमच्या स्मार्टफोनला आकर्षक बनवत असल्या, तरी त्यांचे काही तोटेही आहेत. हे अ‍ॅप्स तुमच्या इंटरनेटचा जास्त वापर करतात. तसेच तुमची माहितीही त्यांच्याकडे जमा होते. शिवाय या अ‍ॅप्लिकेशन्सचे मोफत ‘व्हर्जन्स’ जाहिरातींनी भरलेले असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी थिम्स बदलताना किंवा अ‍ॅप्लिकेशन ओपन केल्यानंतर अ‍ॅड्सचे कुकीज तुमच्या स्मार्टफोनमध्ये शिरकाव करतात. त्यामुळे हे अ‍ॅप्लिकेशन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वर दिलेल्या अ‍ॅप्लिकेशन्सखेरीज तुमच्या स्मार्टफोनचे रुपडे बदलणारे अनेक अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची निवड करताना दक्षता बाळगायला हवी. यासाठी प्रत्येक अ‍ॅपच्या पेजवर असलेले यूजर रिव्ह्य़ू उपयुक्त ठरू शकतात.

नोव्हा लाँचर
प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले सध्याचे सर्वात लोकप्रिय ‘लाँचर’ अ‍ॅप्लिकेशन आहे. पूर्णपणे मोफत असलेले हे अ‍ॅप केवळ अँड्रॉइड ४.०पेक्षा अधिक क्षमतेच्या ऑपरेटिंग सिस्टीमवरच काम करू शकते. या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या कलर थीम्स, स्किन्स, मेनू बटण, डॉक, विजेट, आयकॉन्स या सर्व गोष्टी बदलू शकता. ट्रान्सपरन्सी, स्क्रोल इफेक्ट यांमुळे तुमचा स्मार्टफोन अधिक आकर्षक होतो. यामध्ये असंख्य पर्याय असले तरी त्याचा तुमच्या स्मार्टफोनच्या ऑपरेटिंगवर किंवा मेमरीवर फारसा परिणाम होत नाही.

गो लाँचर एक्स
प्ले स्टोअरवरील सर्वात जुने ‘लाँचर’ अ‍ॅप असलेल्या गो लाँचरमध्ये दहा हजारांहून अधिक थिम्स, स्किन्स उपलब्ध आहेत. यामध्ये थ्रीडी इफेक्टची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय क्लॉकपासून कॅलेंडपर्यंतच्या गोष्टींचे विविध प्रकारचे विजेटही ‘गो लाँचर’च्या मदतीने बदलता येतात.

बझ लाँचर
तुम्हाला हवी तशी थिम तयार करण्याची सुविधा देणारे हे अ‍ॅप्लिकेशन आहे. तुम्ही वेगवेगळय़ा ऑप्शन्सच्या मदतीने तुम्हाला हवी तशी थिम तयार करून ती इतरांशी शेअरही करू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून तीन लाख थिम्स उपलब्ध असल्याचा दावा हे अ‍ॅप विकसित करणाऱ्यांचा आहे.