05 June 2020

News Flash

सफर ‘अॅप’ली आपली

दिवाळीची सुटी जवळ येताच प्रत्येकालाच पर्यटनाचे वेध लागतात.

दिवाळीची सुटी जवळ येताच प्रत्येकालाच पर्यटनाचे वेध लागतात. पावसाळा नुकताच माघारी परतलेला असतो आणि थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झालेली असते. वातावरणात गारवा असतो आणि निसर्ग अधिक संपन्न झालेला असतो. अशा माहोलमध्ये सहलीवर जाण्यासाठी प्रत्येकजण इच्छुक असतो. अनेकजण तर या सुटीतील पर्यटनासाठी काही महिने आधीपासून तयारी वगैरे करत असतात. पण बहुतेकांचे सुटीतले बेत ऐनवेळीच ठरत असतात. कधी सुटी मिळण्याबाबतची साशंकता तर कधी आर्थिक गणित, कधी मुलांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता तर कधी आप्तेष्टांची निमंत्रणे अशा या ना त्या कारणाने दिवाळीच्या सुटीचे ‘प्लॅनिंग’ करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. मग ऐनवेळेस पर्यटनाचे बेत आखले जातात. परंतु त्यासाठी प्रचंड धावपळही करावी लागते. अर्थात आजच्या ‘स्मार्ट’ जगात ही सारी धावपळ न करताही पर्यटनाची हौस भागवता येऊ शकते.

तुमच्या हातातील स्मार्टफोन या साऱ्या धावपळीवरील सर्वात चांगला पर्याय आहे. विण्डोज, अॅण्ड्रॉइड, अॅपल यांपैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध असलेले अनेक अॅप्स तुमच्या सहलीचे पूर्ण प्लॅनिंग करू शकतात. त्या पर्यटनस्थळाची वैशिष्टय़े, तेथील महत्त्वाची ठिकाणे, तेथील जनजीवन, खाद्यपदार्थ, शॉपिंगच्या वस्तू अशा सामान्य माहितीपासून त्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवासखर्च, गाडय़ा-विमानांचे वेळापत्रक, तेथे राहण्याची सुविधा अशा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन या अॅप्सच्या माध्यमातून मिळते. स्मार्टफोनच्या प्लॅटफॉर्मवर असे असंख्य अॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रभावी आणि हाताळण्यास अधिक सुलभ असलेल्या अॅप्सची माहिती सोबत देत आहोत.

कायाक (Kayak)
कोणत्याही ठिकाणी जायचं म्हटलं की पहिला प्रश्न प्रवासाचा उद्भवतो. अलीकडे ऑनलाइन तिकीट बुकिंगचा चांगला आणि जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र त्यातही इतके अॅप्स आणि संकेतस्थळे सुरू झाली आहेत की, त्यावरील वेगवेगळ्या किमती आपल्याला संभ्रमात पाडतात. अशा सर्व संकेतस्थळांची तुलना करून एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर ‘कायाक’ हे अॅप अतिशय उत्तम आहे. विविध कंपन्यांच्या विमान सेवेची तुलना, हॉटेल, कारचे बुकिंग, निवासाचे वेगवेगळे पर्याय, विमानाच्या वेळेचे ‘ट्रॅकिंग’, विमानावरील खानपानाची निवड, विमानतळाची माहिती अशा अनेक गोष्टी या अॅपवर उपलब्ध आहेत.

ट्रिप इट (Trip It)
नावातच ‘ट्रिप’ असलेल्या या अॅपवर एका दमात तुमच्या संपूर्ण प्रवासाची इत्थंभूत माहिती उपलब्ध होऊ शकते. याशिवाय विमान तिकिटांचे बुकिंग, हॉटेल, कार यांचे पर्याय, नकाशे, दिशादर्शक अशा सर्व माहितीपर गोष्टी येथे उपलब्ध आहेत. ‘ट्रिप इट’च्या माध्यमातून तुम्ही एकाच ठिकाणी तुमच्या संपूर्ण प्रवासाचे नियोजन आणि हाताळणी करू शकता. याशिवाय या अॅपवरून तुम्ही तुमचे प्रवासाचे बेत, खानपानाची निवड, आधीच्या प्रवासाची माहिती आदी गोष्टी फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन अशा समाजमाध्यमांवरही ‘शेअर’ करू शकता.

रेडबस डॉट इन (redBus.in)
संकेतस्थळांवरील प्रवासाच्या बुकिंगचा सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय असलेल्या ‘रेडबस’चे अॅपही चांगली सुविधा देते. विशेषत: तुम्ही बसने प्रवास करणारे असाल तर ‘रेडबस’ तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या अॅपवर केएसआरटीसी, एसआरएस, केपीएन, व्हीआरएल यांसारख्या विविध राज्य परिवहन मंडळांच्या तसेच खासगी बसवाहतूक कंपन्यांच्या तब्बल दहा हजारहून अधिक बसमार्गाची माहिती उपलब्ध आहे. हे मार्ग निवडून त्या बसची तिकिटे आरक्षित करण्याची सुविधाही या अॅपवर उपलब्ध आहे. त्यासाठी क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, डेबिट कार्ड यांपैकी कोणत्याही माध्यमाचा वापर करता येतो. याशिवाय यामध्ये दिशादर्शनाचीही व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

फोरकास्टर (4castr)
प्रत्येक वेळी प्रवासाला जातानाच्या बॅगा भरताना ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणच्या हवामान, तापमानाची माहिती घेऊन कपडे निवडले जातात. यासाठी ‘फोरकास्टर’ हे अतिशय मार्गदर्शक अॅप आहे. या अॅपवरून त्या ठिकाणचे सध्याचे तापमान, हवामानाचा अंदाज यांसह अन्य हवामानविषयक बाबींची माहिती मिळते. हे अॅप विण्डोज फोनवरच उपलब्ध आहे. मात्र, अॅण्ड्रॉइड आणि अॅपलच्या फोनसाठी असेच अन्य पर्यायही उपलब्ध आहेत.

फूडस्पॉटिंग (Foodspotting)
ज्या ठिकाणी जाणार तेथील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला नाही तर पर्यटनाचा आनंद तो काय? प्रत्येक ठिकाणचे वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ हे तेथील लोकसंस्कृतीचे प्रतीक असते. त्याची माहिती घेऊन आपण तो पदार्थ चाखण्याचे बेतही आखतो. मात्र तो पदार्थ कोणत्या हॉटेलमध्ये किंवा उपाहारगृहात अधिक चांगला किंवा स्वस्त मिळतो, हे शोधणे कठीण असते. ते काम फूडस्पॉटिंगमुळे सोपे होऊ शकते. या अॅपमध्ये असंख्य ठिकाणांवरील अनेक पदार्थ, ते मिळण्याची ठिकाणे यांची माहिती उपलब्ध आहे.

एटीएम लोकेटर (ATM Locator)
पर्यटनस्थळावर गेल्यानंतर आपल्याच बँकेचे एटीएम शोधणे हे एक मोठे आव्हान असते. अलीकडे कोणत्याही बँकेचे एटीएम केंद्र वापरण्याची मुभा मिळाली आहे. मात्र त्यावर ठरावीक व्यवहारांनंतर शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत ‘एटीएम लोकेटर’ अॅपच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हव्या त्या बँकेचे एटीएम शोधू शकता. शिवाय या अॅपवरून त्या एटीएम केंद्राला जाईपर्यंतचे ‘नेव्हिगेशन’ही देण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2015 7:10 am

Web Title: mobile applications for tourism
टॅग Tech It
Next Stories
1 खिशातला संगणक
2 पाहू या नोबेल सोहळा
3 भारतात ‘आयफोन ६ एस’ आणि ‘६ एस प्लस’च्या विक्रीला सुरूवात
Just Now!
X