प्रश्न – अनेकदा अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर मोफत रिचार्जचे संदेश येत असतात. हे मोफत रिचार्ज खरे असते की त्यात काही बनावटपणा असतो? याबद्दल मार्गदर्शन करावे. – समृद्धी िशदे
उत्तर –    अँड्रॉइड अ‍ॅप स्टोअरवर अशा ‘फ्री रिचार्ज अ‍ॅप’चा चांगलाच बोलबाला आहे. अनेक महाविद्यालयील विद्यार्थी या अ‍ॅपच्या माध्यमातून रिचार्ज करतात आणि आपला पॉकेटमनी वाचवतात. यामध्ये अगदी दोन रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंतचे रिचार्ज देणारे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेल्या भारतीय संदेशवहन अ‍ॅप ‘हाईक’ने हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला आपल्या मित्रांना देणाऱ्यांना दहा ते वीस रुपयांचा टॉकटाइम देऊ केला होता. यानंतर अशा प्रकारच्या अ‍ॅप्सची संख्या चांगलीच वाढली आहे. काही कंपन्या आपले अ‍ॅप डाऊनलोड व्हावे या उद्देशाने ही सुविधा देत आहेत, तर काही कंपन्या लाखो मोबाइलधारकांची माहिती मिळवण्यासाठी ही शक्कल लढवीत आहेत. यामध्ये ‘पॉकेट’ नावाचे एक अ‍ॅप असून ते विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा मिळवून देते. हे अ‍ॅप आपण डाऊनलोड केल्यावर यामध्ये आपल्याला विविध कंपन्यांचे सर्वेक्षण पाहावयास मिळतात. हे सर्वेक्षण आपण भरून दिले, की आपल्याला एक ते पाच रुपयांपर्यंतचा टॉकटाइम मोफत मिळतो. इतकेच नव्हे, तर जर हे अ‍ॅप आपण आपल्या मित्रांना सुचविले आणि त्यांनी ते डाऊनलोड केले, की आपल्याला पाच रुपयांचा टॉकटाइम नक्की मिळतो. अशा प्रकारे महिन्याला पाचशे रुपयांपर्यंतचे टॉकटाइम मिळवलेल्यांची उदाहरणेही आहेत. अशाच प्रकारे ‘फ्री प्लस’ नावाचे एक अ‍ॅप आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या ऑफर्स पूर्ण करून वीस रुपयांपर्यंत टॉकटाइम मिळवता येऊ शकतो. तसेच हे अ‍ॅप आपण मित्रांना सुचविले, तर त्याचेही सात रुपये आपल्याला खात्यात जमा होतात.
    तुम्हाला सर्वेक्षण किंवा ऑफर्स देणारे अ‍ॅप घेऊन टॉकटाइम वाढवायचा नसेल, तर काही असेही अ‍ॅप्स आहेत, की जे तुम्ही डाऊनलोड केल्यावर थेट टॉकटाइम देतात. यामध्ये स्नॅपडीलचे अ‍ॅप तीन रुपये देते, तर क्विकरचे अ‍ॅप दोन रुपये, जबाँगचे अ‍ॅप दोन रुपये आपल्या प्रीपेड खात्यात जमा करतात. या सर्व अ‍ॅप्सनी विविध मोबाइल कंपन्यांशी सामंजस्य करून या सुविधा देऊ केल्या आहेत. या सुविधा प्री-पेड ग्राहकांसाठी असून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी आपण वापरत असलेली मोबाइल नेटवर्क सेवा पुरविणारी कंपनी या अ‍ॅपच्या ‘फ्री रिचार्ज’ यादीत आहे की नाही हे तपासून घ्या.
तंत्रस्वामी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free mobile recharge tricks real or fake
First published on: 05-05-2015 at 06:40 IST