जुलै महिना संपता संपता पावसाने कृपादृष्टी दाखवली आणि मान्सूनच्या विलंबाने धास्तावलेल्या अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला. त्यामुळेच की काय कोण जाणे, पण जुलै महिन्यात भारतीय बाजारपेठेत नवनव्या गॅझेटची रांगच लागली. अर्थातच यात स्मार्टफोन आघाडीवर आहेत. गेल्या महिनाभरात भारतीय बाजारात दाखल झालेल्या काही वैशिष्टय़पूर्ण गॅझेटविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झेब्रॉनिक्स’चे मायक्रोड्रम
संगणकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या भारतातील आघाडीच्या इन्फोट्रॉनिक्स कंपनीने आपल्या झेब्रॉनिक्स ब्रँडच्या नावाखाली २.१ चॅनेलचे मल्टिमीडिया स्पीकर बाजारात आणले आहेत. ‘मायक्रोड्रम प्लस’ नावाचे हे स्पीकर आकाराने लहान असले तरी यातील तीन इंच ड्रायव्हर असलेल्या सबवुफरमुळे त्यातून प्रतीत होणारा ध्वनी मोठा आहे. लॅपटॉप, कॉम्प्युटर, मीडिया प्लेअर्स यापैकी कोणत्याही उपकरणाशी जोडून हे स्पीकर चालवता येतात. या स्पीकरमध्ये यूएसबी पोर्टही पुरवण्यात आला असून त्याला पेनड्राइव्ह जोडूनही गाण्यांचा आनंद घेता येतो. विशेष म्हणजे, या स्पीकरना मेमरी कार्डचा स्लॉटही पुरवण्यात आला आहे. त्यामुळे मेमरी कार्ड टाकूनही या स्पीकरवर गाणी ऐकता येतात. या स्पीकरना एफएम रेडिओचीही सोय आहे. बाजारात या स्पीकरची किंमत ९९९ रुपये असून कंपनीने यासोबत एका वर्षांची वॉरंटीही दिली आहे.

एलजीचा जबरदस्त ‘जी३’
एलजी कंपनीने या वर्षांच्या सुरुवातीला घोषणा केल्यापासून ‘जी३’बद्दल कमालीची उत्सुकता होती. त्या ‘जी३’ने भारतीय बाजारात दणक्यात प्रवेश केला आहे. ‘साधेपणातच नवचातुर्य’ (सिम्पल इज न्यू स्मार्ट) या संकल्पनेवर आधारित ठेवून एलजीने आणलेल्या ‘जी३’ची अनेक वैशिष्टय़े आकर्षित करणारी आहेत. ५.५ इंचांचा क्वाड एचडी डिस्प्ले हे या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. सध्याच्या फुल एचडी डिस्प्ले असलेल्या फोनपेक्षाही दुप्पट सुस्पष्टता देणारा हा डिस्प्ले सध्याच्या एचडी डिस्प्लेच्या चौपट रेसोल्युशन असलेला आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजर प्लस सुविधा असलेल्या १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा या स्मार्टफोनचे दुसरे प्रमुख वैशिष्टय़ आहे. शिवाय या कॅमेऱ्याला ‘लेझर ऑटो फोकस’ही सुविधाही असल्याने क्षणार्धात हा कॅमेरा स्पष्ट छायाचित्रे टिपू शकतो. चमकदार बॉडी असलेला हा फोन वजनाने हलका असून हातांच्या ठशांनीही तो खराब होत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. स्मार्ट कीबोर्ड हे या फोनचे आणखी एक वेगळेपण आहे. आपल्या सोयीने आकाराने कमी-जास्त करता येऊ शकणारा हा स्मार्ट किबोर्ड अॅडॉप्टिव्ह तंत्रज्ञानावर काम करतो, त्यामुळे त्यावरून वेगाने शब्द टाइप करता येतात. शिवाय यावरील अक्षरांच्या बटणांमध्ये आपल्या सोयीने बदलही करता येतात. स्मार्ट नोटीस आणि स्मार्ट सिक्युरिटी असे आणखी दोन स्मार्ट अॅप्लिकेशन्स या फोनमध्ये पुरवण्यात आले आहेत.  
जी३ची अन्य वैशिष्टय़े
क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन (२.५ गिगाहार्ट्झ क्वाड कोअर) प्रोसेसर
१६/३२ जीबी मेमरीत उपलब्ध
३००० एमएएच बॅटरी
फ्रंट कॅमेरा २.१ मेगापिक्सेल
४जी, ३जी, २जी
किंमत : ४३ ते ४९ हजार रुपये

पॅनासॉनिकचा ‘ट्रिपल’ धमाका
स्मार्टफोनच्या बाजारात आपल्या फोनना मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या जोरावर पॅनासॉनिकने नवनवीन स्मार्टफोन आणण्याचा चंग बांधला आहे. कंपनीने गेल्या आठवडय़ातच टी४१, पी४१ आणि पी६१ असे तीन वेगवेगळय़ा किंमत श्रेणीतील स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन १.३ गिगाहार्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसरवर तसेच अँड्रॉइड किटकॅट या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. तिन्ही फोन्सना फुल एचडी कॅमेरा असून त्याला ऑटो फोकस आणि एलईडी फ्लॅश या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या फोन्ससोबत पॅनासॉनिकने ‘ग्लाइड प्ले’ या नवीन क्लृप्तीचा अंतर्भाव केला असून त्याद्वारे फोनवर सुरू असलेले अॅप्स आपल्या सोयीने एकाच वेळी हाताळता येतात. याशिवाय पॉप आय प्लेअर, म्युझिक कॅफे, जेश्चर प्ले प्लस या पॅनासॉनिकच्या सुविधाही या फोन्समध्ये उपलब्ध आहेत.  

पी ६१ची वैशिष्टय़े
६ इंच आयपीएस एचडी डिस्प्ले
एक जीबी रॅम, १६ जीबी इंटर्नल मेमरी(३२ जीबीपर्यंत वाढवणे शक्य)
८ मेगापिक्सेल बॅक कॅमेरा,
२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
२८०० एमएएच बॅटरी
डय़ूअल सिम
किंमत १४९९०/- रुपये

टी४१ ची वैशिष्टय़े
४.५ इंच डिस्प्ले
पाच मेगापिक्सेल बॅक कॅमेरा, व्हीजीए फ्रंट कॅमेरा
५१२ एमबी रॅम, ४ जीबी इंटर्नल मेमरी
(३२ जीबीपर्यंत वाढवणे शक्य)
१६५०एमएएच बॅटरी
किंमत ७९९०/- रुपये

पी४१ची वैशिष्टय़े
५ इंच आयपीएसच डिस्प्ले
एक जीबी रॅम, ८ जीबी इंटर्नल मेमरी (३२ जीबीपर्यंत वाढवणे शक्य)
८ मेगापिक्सेल बॅक कॅमेरा, २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
२००० एमएएच बॅटरी
डय़ूअल सिम
किंमत ११९९०/- रुपये

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadget rain
First published on: 01-08-2014 at 12:30 IST