कानात फिट बसणारे ‘आयईएम’
हेडफोनचा सर्वत्र सामान्य असलेला प्रकार म्हणजे आयईएम (इन-इअर मॉनिटर्स) हेडफोन. बारीकशा वायरीने जोडले गेलेले हे हेडफोन कानात अतिशय व्यवस्थित बसतात. आकाराने ८ ते १० मिमीचे हे हेडफोन अतिशय छोटय़ा ड्रायव्हर्सनिशी काम करत असतात. वापरायला सहजसोपे, नगण्य वजन, गुंडाळून सहज खिशात मावणारे असे असल्याने हे हेडफोन प्रवासादरम्यान वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. कानात फिट बसत असल्याने यातून येणारा ध्वनी अतिशय प्रभावी असतो. अशा प्रकारचे हेडफोन १०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
‘ऑन इअर्स’ हेडफोन
‘इन इअर्स’ हेडफोन कानात बसतात तर ‘ऑन इअर्स’ हेडफोन कानावर व्यवस्थित बसणारे असतात. अशा प्रकारच्या हेडफोनना जोडणारा हेडबॅण्ड असतो. केवळ कानाच्या पाळीमध्ये हूक अडकवून कानावर व्यवस्थित बसणारे हेडफोनही सध्या उपलब्ध होतात. या हेडफोनमधील ड्रायव्हर चांगले असल्याने त्यातून येणारा आवाज विशेषत: बेस मोठा असतो. अशा हेडफोनना बऱ्याचदा माइकही जोडलेला असतो. बाजारात अशा हेडफोनची किंमत १५० रुपयांपासून सुरू होते.
‘ओव्हर इअर्स’ हेडफोन
कान पूर्णपणे झाकून त्याभोवती घट्ट बसणारे ‘ओव्हर इअर्स’ हेडफोन अलीकडे अतिशय लोकप्रिय ठरू लागले आहेत. हे हेडफोन काहीसे जड आणि मोठे असले तरी महाविद्यालयीन तरुण-तरुणी अशा हेडफोनचा वापर जास्त करताना दिसतात. मोठय़ा आकारानुसार या हेडफोनमधून येणारा ध्वनी अतिशय मोठा आणि स्पष्ट असतो. अशा हेडफोनची किंमत अडीचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपेक्षाही जास्त असते.
गेमिंग हेडफोन
व्हिडीओ किंवा कॉम्प्युटर गेम खेळण्याचा आनंद त्यातील ध्वनीच्या परिणामकतेतून अधिक वाढत असतो. त्यामुळे आता गेमिंगसाठी वेगळे हेडफोन बनवण्यात येत आहेत. हे हेडफोन गेममधील ध्वनीला ‘इफेक्ट’ देऊन त्याचा प्रभाव वाढवतात. त्यामुळे येणारा ध्वनी हा प्रत्यक्ष आवाजासारखा असतो. ‘स्टीलसीरिज सिबेरिया एलाइट प्रीझम’सारख्या कंपनीचे हेडफोन ‘व्हच्र्युअल’ आवाजाची अनुभूती देतात, तर ‘रेझर टीअ‍ॅमॅट’च्या हेडफोनमधून ७.१ चॅनेलक्षमतेच्या स्पीकरसारखा सराउंड साऊंड ऐकायला मिळतो. अशा प्रकारचे हेडफोन तीनशे रुपयांपासून वरील किमतीत उपलब्ध आहेत.
वायरलेस हेडफोन
आजकाल जमाना वायरलेसचा आहे. यातून हेडफोन दूर कसे राहतील? सध्या बाजारात वायरलेस हेडफोनना प्रचंड मागणी आहे. वायरशी जोडलेले नसल्याने हाताळण्यास सहज असलेले हे हेडफोन रेडिओ फ्रीक्वेन्सी, इन्फ्रारेड किंवा ब्ल्यूटुथ तंत्रज्ञानांनी जोडलेले असतात. यापैकी पहिल्या दोन तंत्रज्ञानांतर्गत असलेल्या हेडफोनचा एक भाग म्युझिक सिस्टीमशी जोडलेला असतो. मात्र, ब्ल्यूटुथ हेडफोन पूर्णपणे स्वतंत्र राहून काम करतात. अशा प्रकारचे हेडफोन सातशे रुपयांपासून पुढील किमतीत उपलब्ध आहेत.
हेडफोन खरेदी करताना..
हेडफोन खरेदी करताना त्यातून येणारा ध्वनी, त्याचा आकार यासोबतच त्याची किंमत हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, हे सर्व तपासतानाच खालील गोष्टींची चाचपणी केली पाहिजे.
आपल्याला कानात फिट बसणारा (इअरबड) हेडफोन हवाय की कानावर बसणारे हेडफोन, हे सर्वप्रथम ठरवा. ही निवड करताना हेडफोनचा जास्त वापर कधी होणार आहे, हे पाहिले पाहिजे. प्रवासात वापर जास्त होणार असेल तर ‘इअरबड’ हेडफोन कधीही चांगले. तर घरातील म्युझिक सिस्टीमवरून गाणी ऐकण्यासाठी ‘ऑनइअर’ किंवा ‘ओव्हर इअर’ हेडफोन उपयुक्त ठरतात.
’हेडफोनमधून गाणी ऐकताना कमी आवाजातही ते सुस्पष्ट ऐकू आले पाहिजे, याची काळजी घ्या. आवाज मोठा करूनच संगीत व्यवस्थित ऐकता येत असेल तर अशा हेडफोनचा उपयोग होत नाही. हेडफोन कानाला लावल्यानंतरही आजूबाजूचा आवाजच जास्त येत असेल तर फायदा नाही.
’हेडफोनची फ्रिक्वेन्सी पाहणेही महत्त्वाचे आहे. १० हार्ट्झपासून २५ हजार हार्ट्झदरम्यानची फ्रिक्वेन्सी असलेले हेडफोन केव्हाही चांगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Headphone new update and information
First published on: 01-09-2015 at 06:05 IST