अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोनमध्ये वेळोवेळी नवनवीन गोष्टी/ सुविधा आपल्याला पाहायला मिळतात. यातल्या अनेक सुविधांची माहिती नव्या स्मार्टफोनसोबत येणाऱ्या ‘यूजर मॅन्यूअल’मध्ये दिलेली असते. मात्र अॅण्ड्रॉइड ही ‘ओपन सोर्स’ अर्थात खुला स्रोत असलेली कार्यप्रणाली असल्याने त्यावरील अनेक सुविधा अशा असतात, ज्या आपल्याला माहीतही नसतात. या सुविधा अगदी छोटय़ा छोटय़ा बदलांनी वापरायला मिळतात व त्या उपयुक्त ठरतात. अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवरील अशाच काही युक्त्यांबद्दल..

अॅण्ड्रॉइडवरील ‘स्मार्ट लॉक’
आपला फोन कुणाच्याही हातात पडला तरी त्याला तो पाहता येऊ नये, यासाठी स्मार्टफोनवर ‘लॉक’ची सुविधा देण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा आपल्याला अनेकदा त्रासही होतो. विशेषत: घाईगडबडीच्या वेळी आपल्याला फोनचा ‘पॅटर्न लॉक’ काढण्यासाठी खर्च होणारा वेळही युगासमान वाटतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये ‘स्मार्ट लॉक’ची सुविधा कार्यान्वित करू शकता. ही सुविधा सुरू करण्यासाठी स्मार्टफोनच्या ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘सिक्युरिटी’वर क्लिक करा. तेथे ‘स्मार्ट लॉक’ची सुविधा दिसेल. त्यामध्ये तुम्हाला विविध पर्याय दिसतील. यात तुमचा फोन कुठे लॉक असला पाहिजे, कुठे तुम्ही केवळ ‘स्वाइप’ने फोन अनलॉक करू शकता, अशा पर्यायांचा समावेश आहे.

‘सायलंट’ फोनची शोधाशोध
आपला फोन आपण कुठे तरी ठेवून विसरतो आणि मग कुणाला तरी ‘रिंग द्यायला’ विनवणी करावी लागते. रिंग वाजल्यामुळे फोन सापडतो. पण अशा प्रसंगी फोन ‘सायलेंट मोड’मध्ये असेल तर..? फोन ‘सायलेंट’ असेल तर कितीही कॉल करून तुम्हाला त्याचा शोध लागणार नाही. अशा वेळी ही युक्ती वापरून बघा.
तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या इंटरनेट ब्राऊजरवर जाऊन http:android.com/devicemanager ही लिंक खुली करा. त्यावरील लॉग इन स्क्रीनमध्ये तुमच्या फोनवरील ‘जी मेल’ आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर दिसणाऱ्या पेजच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन लगेच शोधू शकता. अगदी फोन सायलेंट असेल तरी या सुविधेच्या माध्यमातून तो मोठमोठय़ाने रिंग होतो.

‘डेव्हलपर’ व्हा!
तुमच्या अॅण्ड्रॉइड फोनवरील अंतर्गत किंवा पडद्यामागील घडामोडींवर बऱ्यापैकी नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फोनचा ‘डेव्हलपर’ झालं पाहिजे. यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज नाही. तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अबाऊट फोन’वर क्लिक करा. त्या स्क्रीनवर तुमच्या मोबाइलचा ‘बिल्ड नंबर’ अर्थात आवृत्ती दिसेल. त्या पर्यायावर पाच ते सात वेळा क्लिक करा. तुम्हाला ‘यू आर अ डेव्हलपर’ असा संदेश पाहायला मिळेल. याचा अर्थ आता तुम्ही तुमच्या मोबाइलच्या अंतर्गत यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही नियंत्रण आणू शकता.
डेव्हलपर होण्याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या फोनचा स्पीड वाढवू शकता. बऱ्याचदा दोन अॅप्समध्ये जाताना किंवा ‘स्क्रीन’ पुढे सरकवताना आपला फोन काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. अशा वेळी सेटिंगमध्ये जाऊन ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ हा पर्याय निवडा. त्यामध्ये ‘अॅनिमेशन स्केल’चा पर्याय दिसेल. ‘अॅनिमेशन स्केल’ कमी केल्यावर तुम्हाला तुमच्या फोनच्या वेगात सुधारणा झाल्याचे दिसेल.
आयफोनवर मोबाइल डेटाची बचत
मोबाइलवरील इंटरनेट डाटा दिवसेंदिवस महाग होत चालल्याने आपण त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करत असतो. मात्र अनेक अॅप्स असे असतात, जे त्यांचा वापर न करतादेखील इंटरनेट डाटा वापरत असतात. त्यामुळे आपला डाटा आणि पैसा खर्च होतो. अशा अॅप्सवर नियंत्रण आणण्याची सुविधा ‘आयओएस’वर आधारित फोनमध्ये अर्थात आयफोनमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी फोनच्या ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘ऑथराइज टू यूज डाटा’ हा पर्याय रद्द करा (अनसिलेक्ट करा).
कोणत्या अॅप्सना इंटरनेट वापरण्याची परवानगी द्यायची, हेदेखील तुम्ही ठरवू शकता. त्यासाठी सेटिंगमध्ये सुविधा उपलब्ध असून त्यात तुम्ही डेटाखाऊ अॅप्सना केवळ ‘वायफाय’मध्ये चालण्याची मर्यादा घालू शकता.