बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी नोकियाने अलीकडेच लुमिआ मालिकेत ६३० हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा हॅण्डसेट दिसायला इतर लुमिआ मॉडेल्सप्रमाणे तेवढाच आकर्षक आहे. हॅण्डसेटच्या मागच्या बाजूस मध्यभागी कॅमेरा आणि खालच्या बाजूस उजवीकडे स्पीकरची सोय देण्यात आली आहे. हॅण्डसेटच्या वरच्या बाजूस हेडफोन जॅक, तर खालच्या बाजूस मायक्रो यूएसबी स्लॉट देण्यात आला आहे, ज्याचा वापर चार्जिग किंवा डेटा टान्स्फरसाठी करता येऊ शकेल. हॅण्डसेटच्या उजव्या बाजूलाच पॉवर ऑन-ऑफचे बटण आणि आवाज कमी-अधिक करण्याची सोय देण्यात आली आहे. पूर्वी देण्यात आलेले कॅमेऱ्याचे शटर क्लिक्  बटण नव्या लुमिआमधून काढून टाकण्यात आले आहे.
नोकिया लुमिआ ६३०मध्ये ६२० आणि ५२०ची दोन वैशिष्टय़े एकत्र पाहायला मिळतात. लुमिआच्या सुरुवातीच्या हॅण्डसेटमध्ये चौकोनाचे कोपरे हे टोकदार होते. ६२०मध्ये ते काहीसे गोलाकार झाले. त्यामुळे हा हॅण्डसेट दिसायलाही चांगला होता आणि वापरायलाही. तेच तत्त्व आता या हॅण्डसेटमध्ये वापरलेले दिसते. शिवाय ५२०मध्ये दिसणारे क्लीअर ब्लॅक पॅनल डिस्प्लेसाठी वापरण्यात आले आहे. त्यामुळे त्यावर रंग अधिक उठावदार दिसतात.
नोकिआ लुमिआ ६३०चा डिस्प्ले ४.५ इंचांचा असून त्याचे रिझोल्युशन एफडब्लूव्हीजीए (८५४ गुणिले ४८०) आहे. त्यासाठी क्लीअर ब्लॅक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यामुळे रंगसंगती पाहताना नेत्रसुखद वाटते. यासाठी गोरिला ग्लास थ्रीचा वापर करण्यात आला आहे. मात्र.. हा कमी जाडीचा हॅण्डसेट असून सकृद्दर्शनी तो आकारमानाच्या बाबतीत आयफोनसारखा दिसतो.
चांगल्या ब्रॅण्डेड कंपन्यांचे स्मार्टफोन्स १२ हजारांच्या आसपास आहेत. हेच लक्षात घेऊन नोकियाने त्यांच्या लुमिआ मालिकेतील फोन तरुणाईला लक्ष्य ठेवून १० हजार किमतीजवळ आणून ठेवले आहेत. त्यामुळे चांगला मोठा स्क्रीन ४.५ इंच आणि चांगला ब्रॅण्ड या दोन्ही गोष्टी एकत्र उपलब्ध झाल्या आहेत.
स्मार्टफोन खरेदी करताना स्क्रीनचा आकार, प्रोसेसर आणि कॅमेरा अशा प्राधान्यक्रमाने गोष्टींची खातरजमा केली जाते. लुमिआ ६३०मध्ये क्वाड कोअर प्रोसेसर वापरल्यामुळे त्याचा वेग चांगला आहे. वापरत असताना कुठेही अडथळे येत नाहीत आणि काम सुरळीत पार पडते, असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले. खरे तर हल्ली १ जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनला तरुण पिढी प्राधान्य देते. मात्र या फोनमध्ये केवळ ५१२ एमबी रॅम वापरण्यात आले आहे. तरीही या मॉडेलच्या बाबतीत कमी रॅम अडचणीचे ठरत नाही. मोठा स्क्रीन देताना रॅमच्या बाबतीत कंपनीने तडजोड केली असावी.
५ मेगापिक्सेल कॅमेऱ्यावर दिवसाउजेडी काढलेले फोटो चांगले येतातच, पण रात्रीच्या अंधारातील फोटोही बऱ्यापैकी येतात, असे लक्षात आले. व्हिडीओ मोडही चांगले काम करतो, शिवाय टिपलेले फोटो एकत्र करण्यासाठी सिनेमाग्राफसारख्या सोयीही दिल्या आहेत. सोशल नेटवर्कवर सारे काही शेअर करण्यासाठी त्या बाबीही एकत्रच उपलब्ध करून दिल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे लेटेस्ट असलेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर या फोनसाठी करण्यात आला आहे. यामध्ये मायक्रो सिम कार्डाचा वापर करावा लागेल. विंडोजमधील टाइल्सचे तरुण पिढीला खूप आकर्षण आहे. या फोनमधील नव्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये टाइल्सचे तुमच्या आवडीनुसार नियोजन करण्याची सोयही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनसाठी िवडोज मोबाइलचे ८.१ हे नवीन व्हर्जन वापरण्यात आले आहे. यामध्ये कपॅसिटिव्ह नेव्हिगेशन कीची सोय काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय नवीन मॉडेलमध्ये भरपूर अ‍ॅप्सचा भडिमार करण्यात आला आहे. यातील वनडाइव्ह, वननोट, ऑफिस हे सारे उपयुक्त आहे.
 क्लीअर ब्लॅक प्रकारातील आयपीएस डिस्प्ले चांगला आहे. फोन वजनाला अतिशय हलका आहे. अलीकडे जवळपास प्रत्येक ब्रॅण्ड क्लाऊड स्टोरेजचीही सोय देते. या मॉडेलसोबत तुम्हाला ७ जीबी क्लाऊड स्टोरेज मोफत आहे. याची बॅटरीही १८३० एमएएच क्षमतेची असल्याने ती दीर्घकाळ व्यवस्थित चालते, असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले. यातील मॅप्स आणि रेडिओ मिक्स ही अ‍ॅप्स युवकांना अधिक आवडतील.
खटकलेली गोष्ट
बजेट स्मार्टफोन म्हणून या फोनला पसंती देण्यास हरकत नाही. फक्त एकमात्र खटकलेली गोष्ट म्हणजे रिव्ह्य़ूदरम्यान असे लक्षात आले की, बोलताना दोन-तीन मिनिटे झाल्यानंतर इअरफोनजवळ हा फोन तापतो. अशा वेळेस फार काळ बोलणे सहजशक्य असणार नाही. बाकी हा फोन तरुणाईला आवडेल, असाच आहे!
भारतीय बाजारपेठेतील किंमत- सिंगल सिम रु. ९,९९९/-,
डय़ूएल सिम रु. ११,५००/-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांगले काय
आकर्षक रंगसंगती
हाताळण्यास सोपा
चांगला कॅमेरा

वैगुण्ये
फार काळ बोलल्यानंतर इअरफोन तापणे

वैशिष्टय़े
मुख्य कॅमेरा    –                 ५ मेगापिक्सेल्स
स्क्रीन     –                          ४.५ इंच
डिस्प्ले    –                         आयपीएस, एलसीडी, क्लीअर ब्लॅक
रिझोल्युशन    –                   ८५४ (गुणिले) ४८० एफडब्लूव्हीजीए
जाडी    –                             ९.२ मिमी.
वजन    –                            १३४ ग्रॅम्स
प्रोसेसर    –                          स्नॅपड्रॅगन ४००,    क्वाड कोअर १.२ गिगाहर्टझ्
रॅम     –                              ५१२ एमबी
मेमरी    –                            ८ जीबी
एक्स्पान्डेबल मेमरी    –      १२८ जीबी
मोफत क्लाऊड स्टोरेज    –      ७ जीबी
बॅटरी क्षमता    –          १८३० एमएएच

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia lumia 630 budget smartphone
First published on: 18-07-2014 at 02:04 IST