स्मार्टफोनपेक्षा अधिक चांगला ‘वापरानुभव’ देणारे टॅब्लेट ग्राहकांचे आकर्षण असतात. मात्र, त्यांची जाडी, आकार, वजन या गोष्टींमुळे अनेकांना ते गैरसोयीचे वाटतात. विशेषत: तुम्ही रेल्वेतून प्रवास करणार असाल तर टॅब्लेट बाळगणं जरा कठीणच. अशा परिस्थितीत फॅब्लेट हा मधला पर्याय ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. अशाच काही स्वस्तातील फॅब्लेटविषयी..
आयबॉलचा अ‍ॅण्डी फॅब्लेट
स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या दरम्यान पुढे येत असलेल्या फॅब्लेटवर नोकियासह अनेक कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. कॉम्प्युटरशी संबंधित उत्पादनांपासून सुरुवात करून मोबाइल क्षेत्रात उतरलेल्या आय बॉलनेही असाच एक फॅब्लेट बाजारात आणला आहे. ५.५ इंच आकाराच्या या फॅब्लेटचं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे त्यातील वायरलेस डिस्प्ले कनेक्टिव्हिटीच्या मदतीने वायफायच्या माध्यमातून फोनवरील व्हिडीओ किंवा स्लाइड्स टीव्हीवर दाखवता येतात. याशिवाय केवळ उलट करताच हा फॅब्लेट ‘म्यूट मोड’मध्ये म्हणजेच ‘सायलंट मोड’मध्ये जातो. याशिवाय थ्रीजी आणि यूएसबी या दोन्ही प्रकारे त्यावरून इंटरनेटशी जोडता येतं. एचडी ७२० पिक्सेलची दृश्यक्षमता, मागे १२ मेगापिक्सेल आणि पुढे दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा या फॅब्लेटला अधिक आकर्षक बनवतो. एक जीबी रॅम, चार जीबीची इंटर्नल मेमरी, जी सेन्सर, क्वाड कोअर प्रोसेसर असलेला हा फॅब्लेट बाजारात १४९९९ रुपयांत उपलब्ध झाला आहे. मात्र, संकेतस्थळे किंवा अधिकृत विक्रेत्यांकडे तो १३४९९ रुपये या सवलतीच्या दरातही मिळू शकेल. सध्या बाजारात ५.५ इंची स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनची खूप चलती आहे. मात्र, अव्वल कंपन्यांचे या आकारातील स्मार्टफोन खिशाला काहीसे जड असतात. अशा वेळी कमी दरात ५.५ इंची स्क्रीनची हौस भागवायची असेल तर आयबॉलचा पर्याय चांगला आहे.
क्झोलो क्यू ३०००
याच पाश्र्वभूमीवर ‘क्झोलो क्यू ३०००’ हा आणखी फॅब्लेट बाजारात दाखल झाला आहे. क्झोलो ही कंपनी अजूनही भारतात स्थिरावत असली तरी त्यांच्या काही स्मार्टफोन्सना चांगली पसंती मिळाली आहे. ‘क्यू ३०००’ हा ५.७ इंचाची एचडी स्क्रीन असलेला फॅब्लेट आहे. या फॅब्लेटचा मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आणि एलईडी फ्लॅश असलेला आहे. तर पुढच्या बाजूस पाच एमपी कॅमेरा पुरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कॅमेऱ्यांना बीएसआय सेन्सर बसवण्यात आला आहे. कमी किंवा अपुरा प्रकाश असलेल्या ठिकाणी छायाचित्रे किंवा व्हिडीओ काढताना हा सेन्सर आपोआप अधिक उजळ रेकॉर्डिग करतो. शिवाय या फॅब्लेटचा वापर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठीही करता येऊ शकतो. डय़ूअल सिमची सोय असलेल्या या ‘फॅब्लेट’मध्ये १.५ गिगा हार्ट्झचा क्वाड कोअर टबरे प्रोसेसर बसवण्यात आला आहे. दोन जीबी रॅममुळे यावरील अ‍ॅप्लिकेशन्सना चांगला वेग मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात ४००० मिलियन अ‍ॅम्पियर हवर इतकी क्षमतेची बॅटरी आहे. याचाच अर्थ टूजी वापरल्यास सलग ३३ तास ती काम करते. या फॅब्लेटमध्ये १६ जीबी इंटर्नल मेमरी आहे. हा स्मार्टफोन बाजारात २०९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
इंटेक्सचा अ‍ॅक्वा ऑक्टा
कोणताही स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा फॅब्लेट खरेदी करताना त्याची प्रोसेसर क्षमता सर्वात महत्त्वाचा पैलू असतो. जेवढा जास्त क्षमतेचा प्रोसेसर तितक्या चांगल्या वेगाने स्मार्टफोन काम करतो. आता तर एकापेक्षा अधिक प्रोसेसरचे स्मार्टफोनही बाजारात येत आहेत. यातच आता इंटेक्सच्या ‘अ‍ॅक्वा ऑक्टा’ची भर पडली आहे. ८-कोअर प्रोसेसर असलेला हा फॅब्लेट आता भारतात येत आहे. सहा इंचाची स्क्रीन असलेल्या या फॅब्लेटचे सर्वात प्रमुख वैशिष्टय़ त्याचा प्रोसेसरच आहे. या क्षमतेच्या प्रोसेसरमुळे तुम्ही एकाच वेळी अनेक अ‍ॅप्लिकेशन्स अजिबात विस्कळीत न होता हाताळू शकता. या प्रोसेसरला पेलण्यासाठी दोन जीबीची रॅम आणि १६ जीबीची इंटर्नल मेमरी ‘अ‍ॅक्वा ऑक्टा’मध्ये देण्यात आली आहे. ही मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. मागे १३ आणि पुढे ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या या फॅब्लेटमध्ये थ्रीजी कॉलिंग सुविधा आहेच शिवाय वायफायही उपलब्ध आहे. अ‍ॅन्ड्रॉइड जेली बिन, डय़ूअल सिम, २३०० मिलियन अ‍ॅम्पियर हवर्स क्षमतेची बॅटरी असलेल्या या फॅब्लेटची बाजारातील किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी ‘स्नॅपडील’ या संकेतस्थळावर तो १९९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
आयबेरीचा न्यूक्लिआ एन २
स्मार्टफोन निर्मितीमध्ये हाँगकाँगमध्ये आघाडीवर असलेल्या आयबेरीने अलीकडेच भारतात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतीयांचे ‘टॅब्लेट प्रेम’ जाणून त्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आयबेरीने नुकत्याच नव्या स्मार्टफोनचीही घोषणा केली आहे. ‘ऑक्सुस न्यूक्लिआ एन २’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे.  १९२०  १०८० पिक्सेलची ५.७ इंची एचडी स्क्रीन, १३ मेगापिक्सेल कॅमेरा, अ‍ॅन्ड्रॉइड जेली बिन ४.२, १.७ गिगाहार्ट्झ ऑक्टा कोअर मीडिया टेक प्रोसेसर, २ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी, ३५०० मिलियन अ‍ॅम्पियर हवर इतकी क्षमता असलेली बॅटरी ही सर्व वैशिष्टय़े पाहिली की हा स्मार्टफोन आहे की टॅब्लेट अशी शंका येते. पण स्मार्टफोन आणि टॅब्लेट यांच्या दरम्यान नव्याने उदयाला येत असलेल्या फॅब्लेट प्रकारचा हा स्मार्टफोन २३९९० रुपयांना मिळेल, असे कंपनीने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, भारतात दाखल होण्यापूर्वी नोंदणी करणाऱ्यांना १९९९० रुपयांत तो देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. एवढी सगळी वैशिष्टय़े आणि कमी किंमत पाहताच कोणत्याही स्मार्टफोन ग्राहकाच्या त्याच्यावर उडय़ा पडतीलच. पण कागदावर जबरदस्त वाटणारा हा स्मार्टफोन प्रत्यक्षात या वैशिष्टय़ांशी प्रामाणिक आहे का, हे पुढच्या आठवडय़ात, त्याची विक्री सुरू झाल्यानंतरच कळेल. २० हजार रुपयांच्या किमतीत १३ मेगा पिक्सेल कॅमेरा असलेले अन्य कंपन्यांचेही स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, न्यूक्लिआ एन २ ची अन्य वैशिष्टय़े पाहता तो ग्राहकांच्या पसंतीला अधिक उतरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phablet vs tablet
First published on: 18-01-2014 at 12:16 IST