मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉपमुळे आता टीव्हीची गम्मत कमी होताना दिसत आहे. हाताच्या तळव्यावर एचडी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने टीव्ही पाहण्याकडे तरुणांचा कल कमी झाला आहे, तर दुसरीकडे मोठय़ा पडद्यावरची क्वालिटी टीव्हीवर दिसावी यासाठी आता अनेकांकडे ३२ इंचांची स्क्रीन असलेलेच टीव्ही पाहायला मिळतात. त्यातही तो एलईडी आणि स्मार्ट टीव्ही असावा असा अनेकांचा आग्रह असतो. टीव्ही चांगला घेतला, पण मग सेटटॉप बॉक्सच्या क्वालिटीमुळे मोठय़ा स्क्रीनवर थिएटरची मजा येत नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एचडी २के सेटटॉप बॉक्सच्या पुढचे काहीतरी यावे असे लोकांना वाटू लागले आहे. आणि या प्रश्नावर टाटा स्कायने उत्तर शोधून काढले आहे.
नुकतेच टाटा स्कायने आपल्या अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) ४के सेटटॉप बॉक्सचे अनावरण २०१५ सालच्या सुरुवातीला करण्याची घोषणा केली. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या स्मार्ट आणि एलईडी टीव्हीवर या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्र पाहण्याचा अनुभव किती सुखकारक असू शकतो, याचा प्रत्यय या वेळी आला. यूएचडी ४केमध्ये तुम्हाला घरात बसून थिएटरमध्ये चित्र पाहत असल्याचा अनुभव मिळतो.
काय आहे यूएचडी ४के?
सर्वसाधारणपणे २केच्या (१९२०७१०८०) तुलनेत यूएचडी ४के सेटटॉप बॉक्स चारपट प्रभावी आहे. त्यामुळे ८.३ मेगापिक्सलवर यूएचडी ४के (३८४०७२१६०) मध्ये टीव्हीवरील चित्र अधिक स्पष्ट आणि ठाशीवपणे दिसण्यास मदत होणार आहे. जवळपास वीस फुटांवरूनही तुम्ही टीव्ही पाहत असाल तरी तुम्हाला चित्र पिक्सलेट झालेले पाहायला मिळणार नाही. तसेच या सेटटॉप बॉक्समध्ये एचडी २के स्ट्रीमच्या तुलनेत फुल एचडी ब्रॉडकास्ट १३ सेकंद जलद होणार आहे. क्रिकेटप्रेमी भारतीयांसाठी क्लोजअप शॉटमध्ये गर्दीतील प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभावही तुम्हाला टिपता येतील. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून टीव्ही पाहत असाल तरी त्याची स्पष्टता कायम राहणार आहे. यूएचडी ४के सेटटॉप बॉक्सवर टीव्ही पाहण्याचा आनंद म्हणजे, तुम्ही जवळपास १० मेगापिक्सलच्या पुढचे चित्र त्याच्या मूळ आकारात पाहत आहात, असा अनुभव तुम्हाला येईल. एवढेच काय, कधी कधी तुम्हाला लांबून एखादे चित्र चांगले दिसते; परंतु जवळ गेल्यावर त्याची स्पष्टता लक्षात येते. यामध्ये तुम्हाला जवळूनही एकही पिक्सलेट झालेले चित्र दिसणार नाही. तसेच टीव्ही पाहताना सिग्नलच्या अडथळ्याशिवाय तुम्हाला कलाकृतीचा आनंद घेता येणार आहे.  
किती स्वस्त, किती महाग?
आजघडीला बाजारात एचडी २के सेटटॉप बॉक्स १७०० ते १८०० रुपयांना उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्हाला साधारण एक वर्षांची वॉरंटी मिळते. २५० ते ५५० रुपयांपर्यंतची कंपन्यांची चॅनेलसाठीची पॅकेजेस आहेत. त्यामुळे २केच्या तुलनेत ४केचे दर चढे असतील याबाबत शंका नाही; परंतु २००० ते २५०० रुपयांपर्यंत यूएचडी ४के सेटटॉप बॉक्स असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आणि साधारण ७०० ते ८०० रुपयांपर्यंत चॅनेलची पॅकेजेस असतील.
स्पर्धक कोण?
व्हिडीओकॉन आणि एअरटेलच्या तुलनेत टाटा स्काय महाग आहे असे बाजार सांगतो. परंतु हल्ली लोकांना क्वालिटी आणि क्वांटिटी असे दोन पर्याय दिले तर लोक क्वालिटी निवडतात. तसेच येणाऱ्या काळात इतर कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली नाही, तर लोकांना टाटा स्कायशिवाय पर्याय उरणार नाही आणि थोडे महाग पण प्रगत तंत्रज्ञान हा पर्याय निवडणे कधीही चांगले.
 भारतात कधी येणार?
२०१५ सालच्या सुरुवातीला भारतातील प्रमुख शहरामध्ये यूएचडी ४के सेटटॉप बॉक्स उपलब्ध होईल असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata sky to launch 4k uhd set top box
First published on: 18-07-2014 at 02:07 IST