व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अशा विविध अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये मोठय़ा प्रमाणात फोटो, व्हिडीओ, जिफ फाइल्स जमा होत जातात. हा साठा जेव्हा आपल्या फोनची ‘स्टोअरेज’ क्षमता कमी करू लागतो, तेव्हा यातील अनावश्यक फाइल्स हटवण्यासाठी आपल्या हालचाली सुरू होतात. परंतु कधी अनवधानाने महत्त्वाची किंवा अनावश्यक फाइल ‘डीलीट’ झाली तर?.. काळजी नको! फोनमधून अचानक गायब झालेल्या किंवा चुकून ‘डीलीट’ झालेल्या फाइल्स पुन्हा मिळवण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आपल्या स्मार्टफोनची स्टोअरेज क्षमता कितीही जास्त असली तरी, कधी ना कधी ती अपुरी पडतेच! याचे महत्त्वाचे कारण, आपल्या फोनमध्ये जमा होणारी छायाचित्रे असतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये असंख्य छायाचित्रे दररोज जमा होत असतात. बहुतेकवेळा आपल्याला याची कल्पनाही नसते. ज्या वेळी ‘फोन स्पेस लो’ अशा स्वरूपाचा संदेश येतो, तेव्हा ही छायाचित्रे घालवण्यासाठी आपली घाईगडबड सुरू होते. अशा गडबडीत एखाद्या वेळी महत्त्वाचा फोटो किंवा फाइल आपल्याकडून हटवली जाण्याचा धोका संभवतो. इतर वेळीही आपल्या नकळत अनेकदा असा प्रकार घडू शकतो. एकदा ‘डीलीट’ झालेल्या फाइल्स पुन्हा मिळायच्या नाहीत, असे समजून आपण हळहळ व्यक्त करतो. परंतु सध्याच्या तंत्रप्रगत युगात गमावलेल्या फाइल्स पुन्हा मिळवणे सहजशक्य आहे. अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ‘डेटा रिकव्हरी’चे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशा पर्यायांची आपण माहिती करून घेऊ या.

‘ड्राइव्ह’वरून गमावलेल्या फाइल्स

‘गुगल ड्राइव्ह’ ही गुगलने प्रत्येक अ‍ॅण्ड्रॉइड वापरकर्त्यांला दिलेली मोफत ‘क्लाऊड स्टोअरेज’ सुविधा आहे. याचा फायदा आपल्याला आपल्या मोबाइलची जागा वाचवण्यासाठी होतोच; शिवाय तुम्ही या माध्यमातून आपल्या महत्त्वाच्या फाइल्स कोणत्याही संगणक अथवा मोबाइलवरून हाताळू शकता. ‘ड्राइव्ह’द्वारे गमावलेल्या फाइल्स मिळवण्याची पद्धत ‘गुगल फोटो’सारखीच सहज साधी आहे. मात्र त्यासाठीही ‘क्लाऊड बॅकअप’ची सुविधा असणे आवश्यक आहे.

अन्य अ‍ॅपचा आधार

तुमच्या मोबाइलमध्ये वरील सुविधा कार्यान्वित नसेल तर, तुम्हाला गमावलेले फोटो वा फाइल्स मिळवण्यासाठी ‘थर्डपार्टी अ‍ॅप’ची मदत घ्यावी लागेल. ‘डिस्कडिगर’सारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडून डीलीट झालेले फोटो तसेच व्हिडीओ पुन्हा मिळवू शकता. हे अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही केवळ ‘स्कॅनिंग’वर क्लिक करताच ते तुमच्या मोबाइलमधून डीलीट झालेल्या फाइल्सची यादीच सादर करते.

‘रिकूव्हा’ चांगला पर्याय

आपल्या मोबाइलमधील गमावलेला डेटा परत मिळवण्यासाठी ‘रिकूव्हा’चा पर्यायही चांगला आहे. यासाठी तुम्हाला ‘डेस्कटॉप’ किंवा ‘लॅपटॉप’ची मदत घ्यावी लागेल. तुमचा फोन संगणकाशी जोडून किंवा फोनचे मेमरी कार्ड संगणकाशी जोडून तुम्ही जुन्या फाइल्स शोधून काढू शकता.

‘गुगल फोटो’ची मदत

तुम्ही खरे ‘स्मार्ट’ असाल तर आपल्या मोबाइलमध्ये जमा होणारी छायाचित्रे ‘गुगल फोटो’वर साठवून ठेवत असाल. ‘गुगल फोटो’ हे असे अ‍ॅप आहे, जे तुमच्या मोबाइलमधील छायाचित्रांचा केवळ ‘बॅकअप’च घेत नाही तर, त्यांना तारीख, स्थळ, प्रसंग अशा वर्गवारीत रचूनही ठेवते. त्यामुळे तुमच्या मोबाइलमधील एखादा फोटो चुकून डीलीट झाल्यास किंवा ‘गुगल फोटो’वरील एखादा फोटो हटवला गेल्यास या अ‍ॅपमध्ये जाऊन तुम्ही तो फोटो परत मिळवू शकता. या अ‍ॅपमध्ये ‘अनडीलीट’ नावाचे एक बटण असते. त्या ठिकाणी आपल्याला हवा तो फोटो ‘सिलेक्ट’ करून तुम्ही तो ‘रीस्टोर’ करू शकता.

अर्थात, यासाठी तुमच्या मोबाइलच्या ‘सेटिंग’मध्ये ‘क्लाऊड बॅकअप’ ही सुविधा कार्यान्वित असणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, तुम्ही गेल्या ६० दिवसांतील फोटोच अशा प्रकारे परत मिळवू शकता.