01 March 2021

News Flash

विज्ञानखेळ

हे अ‍ॅप बक्षीसपात्र बीबीसीच्या मालिकेच्या आधाराने विकसित करण्यात आले आहे.

 

स्मार्टफोनमुळे एका क्लिकवर होणारी कामे एका टचवर होऊ लागली आहेत. याला कोणतेही ठिकाण, काळ, वेळ याचे बंधन नाही. हे सर्व करत असतानाच स्मार्टफोनचा वापर फोनसोबतच मनोरंजनासाठीही होऊ लागला. पण कालांतराने यामध्ये नानाविध पैलू समोर येऊ लागले आणि आता ज्ञानांजनासाठीही स्मार्टफोनचा वापर होऊ लागला आहे. विज्ञान दिनानिमित्त खास विज्ञानविषयक ज्ञान देणाऱ्या अ‍ॅप्सविषयी.

अमेझिंग सायन्स फॅक्ट

जगभरात विज्ञान क्षेत्रात काही ना काही घडामोडी घडत असतात. या विज्ञान क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींचा तपशील या अ‍ॅपद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. नुसती घडामोडच नव्हे तर त्याचा संपूर्ण तपशीलही यामध्ये दिला जातो. याशिवाय तुम्ही विज्ञानातील तुमच्या आवडीच्या विषयाची माहितीही या अ‍ॅपमधून मिळवू शकता. या अ‍ॅपमध्ये विज्ञानाशी संबंधित अनेक तपशील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामुळे विज्ञानाच्या अनेक संज्ञा आणि घडामोडी एका टचवर आपल्याला उपलब्ध होतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवलेली माहिती आपण ई-मेल, फेसबुक आणि ट्विटरवरून शेअर करू शकतो. या अ‍ॅपचा फायदा शिक्षकांनी करून घेतला तर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती शेअर करणे सोपे जाते. याचा वापर ब्रिटनमध्ये विज्ञान शिक्षणासाठी केला जातो.

थ्रीडी ब्रेन

माणसाच्या शरीरातील सर्वाधिक गुंतागुंत असलेला भाग कोणता तर तो म्हणजे मेंदू. या मेंदूची पूर्ण उकल कुणालाच झालेली नाही. मेंदूची रचना समजली तरी  त्यातील प्रक्रिया आजही पूर्णपणे समजलेल्या नाहीत. मेंदूच्या रचनेचा भाग या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांना मेंदूची रचना शिकवणे सोपे जाते. यामध्ये मेंदूचे थ्रीडी मॉडेल देण्यात आलेअसून विविध भाग विविध रंगांनी दाखविले आहेत. ज्यामुळे विविध भाग समजून घेणे सोपे जातात. यामध्ये मेंदूच्या २९ इंटरॅक्टिव्ह रचनाही देण्यात आल्या आहेत.

सायन्स बँक

अंतराळ विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूविज्ञान, पर्यावरण, भौतिकशास्त्र या विज्ञान शाखांतील विविध छायाचित्रे व त्यासंबंधीच्या व्याख्या या अ‍ॅपमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे विज्ञानातील किचकट संकल्पना समजणे सर्वाना सोपे जाणार आहे. केवळ संज्ञाच नव्हे तर त्या विषयाशी संबंधित इतर बाबींचाही तपशील यात देण्यात आला आहे.

ब्रेन कॉक्स वंडर्स

अवकाशातील सूर्यमाला, आकाशगंगा तारे, ग्रह याचा तपशील या अ‍ॅपमध्ये थ्रीडी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अ‍ॅप बक्षीसपात्र बीबीसीच्या मालिकेच्या आधाराने विकसित करण्यात आले आहे. यामुळे यात अवकाशाच्या बारीकसारीक गोष्टींचा तपशील देण्यात आला आहे. तसेच यामध्ये रिअल टाइम थ्रीडी सेन्सही देण्यात आला आहे. यामुळे अवकाशातील ताज्या घडामोडींचा वेध घेणेही यामध्ये शक्य होतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये किमान दोन जीबी रॅम आणि १.५ गीगाहर्टझचा प्रोसेसर असणे आवश्यक आहे.

एनसीईआरटी लर्न सायन्स

केंद्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या या अ‍ॅपमध्ये सीबीएसईचा नववी आणि दहावीचा विज्ञानाचा संपूर्ण अभ्यासक्रम देण्यात आला आहे. यात पुस्तकातील पाठांनुसार सर्व तपशील देण्यात आला असून काही महत्त्वाच्या संकल्पना विस्तृत स्वरूपात स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. या अ‍ॅपमध्ये आकर्षक छायाचित्रांच्या माध्यमातून विषय समजावून सांगण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील बदलांनुसार हे अ‍ॅप अद्ययावत केले जाते. या अ‍ॅपमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट झाला आहे.

बोन्स ह्युमन थ्रीडी

या अ‍ॅपमध्ये मुखपृष्ठावर प्रयोगशाळेत असलेला हाडांचा सापाळा दाखविला जातो. याममध्ये आपल्याला माणसाच्या शरीरातील हाडांच्या रचनेची परिपूर्ण माहिती दिली जाते. यामध्ये दाखविण्यात आलेले प्रारूप त्रिमितीमध्ये उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप वापरण्यासाठी एक जीबी रॅम आणि एचडी स्क्रीन असेल तर हे अ‍ॅप चांगल्या प्रकारे अनुभवता येतो. यामध्ये तुम्ही वेगवेगळे भाग चहुबाजूने पाहू शकता. याचबरोबर नैसर्गिकरीत्या त्या हाडाचे शरीरातील स्थानही यामध्ये दाखविले जाते.

नीरज पंडित – @ nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 5:17 am

Web Title: science apps android science apps mobile apps for scientists
Next Stories
1 ‘तो’  परत आला..
2 आभासी स्मरणशक्ती
3 लिंक्डइन म्हणजे काय?
Just Now!
X