News Flash

तंत्र‘भविष्य’

नवीन वर्षांची चाहूल लागताच प्रत्येकालाच भविष्याचे वेध लागतात

नवीन वर्षांची चाहूल लागताच प्रत्येकालाच भविष्याचे वेध लागतात. नव्या वर्षांत आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्यासाठी नाव, जन्मतारीख, रास अशा विविध निकषांवर मांडले जाणारे भविष्याचे अंदाज पाहिले जातात. हे झालं स्वत:पुरतं. पण केवळ स्वत:चं भविष्य जाणून आडाखे बांधणं म्हणजे एखाद्या शर्यतीत आपणच धावणार आहोत, अशा विचाराने सराव करण्यासारखं आहे. कारण क्षणागणिक आपल्या भोवतीच्या जगात असंख्य बदल घडत असतात. या बदलांचा परिणाम आपसूक आपल्यावरही होत असतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यातही तंत्रज्ञान हे असं क्षेत्र आहे, जिथे बदल किंवा प्रगती हीच आधारभूत संकल्पना आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात झपाटय़ाने होणाऱ्या बदलांचे भारतीय वापरकर्तेही साक्षीदार आहेत. नुकत्याच संपलेल्या २०१५मध्ये तंत्रज्ञानाने किती झेप घेतली, हे गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’ने विस्तृतपणे मांडले. आता नवीन वर्षांत काय घडणार आहे, याची ही झलक..

आभासी जगात खराखुरा प्रवेश
‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ अर्थात आभासी वास्तवाच्या तंत्रज्ञानाबद्दल गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, ते कसं काम करतं, त्याची उपयुक्तता काय आहे, त्याचे परिणाम काय होतील अशा अनेक गोष्टींवर ‘लोकसत्ता’च्या तंत्रज्ञानविषयक पानांतून वेळोवेळी आढावा घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्षात या तंत्रज्ञानाची चुणूकही पाहायला मिळाली. मात्र, नवीन वर्ष या आभासी जगातील खऱ्याखुऱ्या प्रवेशाचं वर्ष असणार आहे. फेसबुकने ताबा मिळवलेली ‘ऑक्युलस रिफ्ट’, सोनीचे ‘प्लेस्टेशन व्हीआर’ आणि एचटीसी ‘व्हाइव्ह’ यांची ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ गॅझेट्स २०१६च्या पहिल्या चतुर्मासातच बाजारात दाखल होतील. त्यापाठोपाठ मायक्रोसॉफ्टचे ‘होलोलेन्स’ डेव्हलपर किट वापरण्यासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे नव्या वर्षांत याबद्दलची चर्चा थांबणं शक्य नाही. तूर्तास ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’कडे ‘गेमिंग’साठीचे नवीन साधन म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर पुढे शिक्षण, आरोग्य आणि संवेदना अनुभूती यासाठी होऊ शकेल. ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन रिसर्च’ या संस्थेच्या निरीक्षणानुसार २०१६मध्ये तब्बल १२ लाख ‘व्हीआर’ उपकरणांची विक्री होण्याचा अंदाज आहे.
कल्पना करा, तुम्ही ऑफिसमध्ये बसले असताना अचानक एखादी महत्त्वाची फाइल घरीच विसरल्याचे तुमच्या लक्षात आले. घरात ती फाइल नेमकी कुठे ठेवलीय, हे कुणालाच माहीत नाही. तुम्हालाही नेमकं ठिकाण नीटसं आठवत नाही. अशा वेळी तुम्हीच ऑफिसमध्ये बसल्या बसल्या ‘व्हीआर’च्या साह्याने घरात ‘प्रवेश’ करून ती फाइल कुठे ठेवलीय हे आठवू शकता. अर्थात ही कल्पना सध्या तरी कल्पना आहे. पण कल्पनेतूनच तंत्रज्ञानाच्या प्रतिभेला नवीन धुमारे फुटतात नाही का?

अ‍ॅमेझॉनची ‘डिलिव्हरी बॉय’ला सुट्टी?
ऑनलाइन शॉपिंगच्या संकेतस्थळांची वाढती संख्या आणि तितक्याच वेगाने वाढत असलेली ऑनलाइन खरेदीदारांची संख्या यांचं प्रमाण नवीन वर्षांत आणखी वाढणार आहे. या कंपन्या आणि ग्राहक यांच्यातील दुवा असतात ते कुरिअर कंपन्या किंवा कंपन्यांचे ‘डिलिव्हरी बॉय’. पण नवीन वर्षांत हा दुवा निखळण्याची दाट शक्यता आहे. ‘ई कॉमर्स’ क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन’ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या साह्याने ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ करण्याचं तंत्रज्ञान सादर केलं. ग्राहकाने निवडलेली वस्तू ‘ड्रोन’ अर्थात मानवरहित विमानाच्या साह्याने अवघ्या ३० मिनिटांत त्याच्या घरी पोहोचती करता येते, हे ‘अ‍ॅमेझॉन’नं गेल्या वर्षी दाखवून दिलं. अशा असंख्य ड्रोनच्या निर्मितीचं काम अ‍ॅमेझॉनच्या केंब्रिज येथील प्रयोगशाळेत सुरू आहे. ते पूर्ण झालं की अ‍ॅमेझॉन ‘ड्रोन’च्या साह्याने ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवायला सुरुवात करेल. याची सुरुवात ब्रिटनमधून होण्याची शक्यता आहे. हे तंत्रज्ञान वेगवान आणि कमी खर्चात सुविधा पुरवणारे असल्याने कदाचित अन्य कंपन्याही ‘ड्रोन’चा अवलंब करतील.

विनाचालक गाडीचे कौतुक
एकीकडे ऑनलाइन शॉपिंग कंपन्या मानवविरहित ‘डिलिव्हरी’साठी प्रयत्न करत असताना परदेशांतील रस्त्यांना चालकविरहित गाडय़ांचेही वेध लागले आहेत. गुगलने विकसित केलेल्या चालकविरहित कारचे प्रयोग संमिश्र यश दाखवत असताना आता गुगलनं या कामी वाहनक्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या फोर्डशी हातमिळवणीसाठी प्रयत्न चालवले आहेत. ५ जानेवारीपासून शिकागोत होत असलेल्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’मध्ये (सीईएस) याची घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडे अनेक कंपन्यांच्या उच्चश्रेणीतील कारमध्ये स्वयंचलित सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, फोर्ड आणि गुगलची कार पूर्णपणे चालविकरहित असेल. गुगलच्या अशा कारनी आधीच चालकाविना एकूण १३ लाख मैल अंतर पार करून दाखवलं आहे. मात्र, या कारच्या तंत्रज्ञानाला आता फोर्डसारख्या अनुभवी वाहन कंपनीच्या यांत्रिकीकौशल्याची आणि आकर्षकपणाची जोड लाभणार आहे.

‘पासवर्ड’ हद्दपार होणार!
इंटरनेटच्या मायाजालात मुक्तपणे वावरताना आपली गोपनीयता किंवा सुरक्षितता राखून ठेवण्यासाठी ‘पासवर्ड’ अत्यावश्यक आहे. पण हॅकिंग करणाऱ्यांनी कितीही गुंतागुंतीचा पासवर्ड असला तरी तो शोधून काढता येतो, हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. त्यामुळे ‘पासवर्ड’च्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यावर वेगवेगळय़ा कंपन्या गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपाय रचत आहेत. ‘सिक्युरिटी क्वेश्चन’, ‘कॅप्चा कोड’, ‘वन टाइम पासवर्ड’ या गोष्टी ‘पासवर्ड’ला अधिक मजबूत बनवतात. त्यातच गुगल आणि याहू यांनी गेल्या वर्षांपासून अन्य उपकरणांवर ‘लॉग इन’ केल्यास त्याचे ‘व्हेरिफिकेशन’ नियमित उपकरणावरून करण्याची पद्धत सुरू केली आहे. याशिवाय ‘फिंगर प्रिंट’ तंत्रज्ञानही आता उच्च श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये येऊ लागले आहे. पण आता त्याहीपुढे जाऊन आपला चेहरा हाच आपला पासवर्ड असेल, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. म्हणजे तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी किंवा ई-मेल वर लॉगइन करण्यासाठी स्मार्टफोन तुमचा ‘सेल्फी’ काढून पडताळणी करेल आणि मगच तुम्हाला पुढे सरकता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. ‘मास्टरकार्ड’ने तर यावर कामही सुरू केले आहे.

‘आयफोन ७’ची बात!
भविष्याची चाहूल घ्यायची म्हटले आणि त्यात ‘आयफोन’चा उल्लेख नसेल असे होणे अशक्यच आहे. स्मार्टफोनच्या बाजाराची आकडेवारी गुगलला वरचढ ठरवत असली तरी आयफोनचा ‘क्लास’ वेगळाच आहे. गेल्या वर्षी ‘आयफोन ६’ने वापरकर्त्यांना भारून टाकलं. तीच किमया नव्या वर्षांत ‘आयफोन ७’ करणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या अ‍ॅपलच्या वार्षिक सोहळय़ात ‘आयफोन ७’ पहिल्यांदा सादर केला जाईल. तो कसा असेल, याची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. ‘तो’ आणखी पातळ असेल, ‘त्याची’ बाजूची बटणे, हेडफोन प्लग नसेल, ‘तो’ पूर्णपणे ‘वॉटरप्रूफ’ असेल अशा अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. पण त्यातलं तथ्य काय आणि मिथ्य काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी सहा महिने तरी वाट पाहावी लागेल.

आसिफ बागवान
asifbagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2016 10:34 am

Web Title: upcoming technology products
टॅग : Tech It
Next Stories
1 एम-इंडिकेटर
2 ही किमया स्पर्शाची
3 ‘एलजी’ घेऊन येतोय गुंडाळून ठेवता येणारा डिस्प्ले
Just Now!
X