20 February 2020

News Flash

 ‘अ‍ॅप’ले डाऊनलोड!

पाहूयात विविध क्षेत्रांतील भारतीय बनावटीचे सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सविषयी.

मोबाइल अ‍ॅप वापरत नाही असा एकही स्मार्टफोनधारक शोधून सापडणार नाही. लोकांचे मनोरंजन करण्यापासून ते शिक्षणापर्यंत सर्व प्रकारचे अ‍ॅप्स सध्या अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत. ४ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार गुगल प्ले या अ‍ॅपबाजारात २५ लाख ७० हजार ६०४ अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यात भारतीय बनावटीच्या अ‍ॅप्सचाही सहभाग आहे. नेहमीच सर्वाधिक डाऊनलोड्स असलेल्या अ‍ॅपच्या यादीत अर्थात गुगल, फेसबुकसारख्या अ‍ॅप्सचे नाव अग्रस्थानी असते; पण भारतीय बनावटीच्या अ‍ॅप्सच्या डाऊनलोडमध्येही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहूयात विविध क्षेत्रांतील भारतीय बनावटीचे सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सविषयी.

प्रवासी अ‍ॅप्स

या विभागात भारतीय बनावटीच्या मेक माय ट्रिप, आयआरसीटीसी आणि गोआयबिबो या अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे.

मेक माय ट्रिप- प्रवासाचे नियोजन करावयाचे असेल तर सर्वप्रथम भारतीय मंडळी मेक माय ट्रिप या अ‍ॅपला भेट देतात. तेथे असलेली माहिती आणि सर्वाधिक सवलती या सर्वाना आकर्षित करतात. यामुळे काळानुरूप या अ‍ॅपचा वापर वाढत गेला. याचबरोबर सर्वच ग्राहक थ्रीजीधारक नसल्यामुळे कंपनीने काही महिन्यांपूर्वी टूजीवर चालणारी विशेष आवृत्ती बाजारात आणली आहे. यामुळे कमी डेटा खर्च करून आवश्यक ती माहिती मिळवणे शक्य झाले आहे.

आयआरसीटीसी – रेल्वेने प्रवास करावयाचा असेल तर सर्व जण आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत आरक्षण नोंदणी संकेतस्थळाला भेट देतात. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे काळानुरूप बदल करत रेल्वेने याचे अ‍ॅपही बाजारात आणले. हे अ‍ॅप आरक्षण करण्यासाठीचा वेळ काही प्रमाणात कमी करते. यामुळे लोक या अ‍ॅपला पसंती देऊ लागले आहेत. याशिवाय या अ‍ॅपवर आयआरसीटीसीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सहलींची माहितीही उपलब्ध करून दिली जाते. याचबरोबर अ‍ॅपद्वारे विमान व हॉटेलचे आरक्षण करणेही शक्य होते.

गोआयबिबो – हे अ‍ॅप हॉटेल, विमान यांच्या आरक्षणासाठी उपयुक्त असून यावर विविध सवलतीही दिल्या जातात. तसेच अ‍ॅपद्वारे आरक्षणाची सुविधाही अधिक जलद होत असल्यामुळे बहुतांश लोक याचा वापर करू लागले आहेत. नुकतेच या कंपनीने आपल्या परिचित कुणीही या अ‍ॅपद्वारे आरक्षण केले तर आपल्याला काही कॅशबॅक देण्यास सुरुवात केली आहे.

मनोरंजन

संभाषणाच्या उपयोगानंतर मोबाइलचा सर्वाधिक वापर हा मनोरंजनासाठी केला जातो. या विभागात बुक माय शो आणि विंक हे अ‍ॅप अग्रस्थानी आहेत.

बुक माय शो – शहरात कोणताही कार्यक्रम असू देत, त्याचे तिकीट काढण्याची सुविधा या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅपमुळे अवघ्या काही सेकंदांत या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे त्या कार्यक्रमाचे तिकीट बसल्या जागेवर उपलब्ध होऊ लागले आहे. नुकतेच मराठी नाटकांनीही या अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट विक्री सुरू केली आहे. याशिवाय या अ‍ॅपवर आपल्याला पुढच्या महिन्याभरात आपल्या परिसरात कोणते कार्यक्रम आहेत याचा तपशीलही मिळतो. यामुळे मनोरंजन करून घेण्यासाठी तिकीट खरेदीचा मोठा टप्पा या अ‍ॅपच्या माध्यमातून सोपा झाला आहे.

विंक  – एअरटेल या भारतीय कंपनीने विंक म्युझिक नावाचे गाण्याचे अ‍ॅप बाजारात आणले आहे. या अ‍ॅपवर तीस लाखांहून अधिक गाण्यांचा संग्रह असून यात भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय गाण्यांचाही समावेश आहे. आपल्याला पाहिजे त्या प्रकारातील गाणे शोधण्याच्या दृष्टीने हे अ‍ॅप वापरास अगदी सोपे झाले आहे. सध्या या अ‍ॅपचे सभासदत्व एअरटेलने थ्रीजी व फोरजी वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे.

पेमेंट

भारताची वाटचाल ही रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे होत असताना मोबाइल वॉलेट्सचा वापर वाढला; पण याआधीही हा वापर होतच होता. या विभागात पेटीएम, फ्रीचार्ज आणि मोबिक्विक या अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे.

पेटीएम – सर्व प्रकारची देयके भरण्यासाठी आणि मोबाइल रिचार्जपासून ते डीटीएच रिचार्जपर्यंतच्या सर्व सुविधा या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. सध्या तर या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण पानवाला, भेळवाला, हार्डवेअरवाला अशा विविध दुकानांमध्येही खरेदी करू शकणार आहोत. या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग करणे, टॅक्सी बुकिंग करणे आदी सुविधांचा फायदाही घेता येतो. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण एकमेकांना पैसे देऊ व घेऊ शकतो.

फ्रीचार्ज – हेसुद्धा पेटीएमप्रमाणेच काम करणारे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनही आपण देयके भरण्यापासून टॅक्सीवाल्याला पैसे देईपर्यंतच्या सुविधांचा फायदा घेऊ शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टक्ट्सना पैसे पाठवू शकतो व त्यांच्याकडून पैसे घेऊपण शकतो. तसेच या अ‍ॅपवर आपल्याला चांगल्या प्रकारे कॅश परतावाही मिळतो.

मोबिक्विक – दुकानांमधील खरेदी रोकडरहित करण्याबरोबरच त्या खरेदीतील काही रोकड परतावा म्हणून देण्यासाठी हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासासाठी उपयुक्त माहिती व तिकिटाचे दर आदी माहिती मिळू शकते. तसेच या अ‍ॅपचा आयआरसीटीसीसोबत सहकार्य करार असल्याने या माध्यमातून रेल्वे आरक्षण करणे अधिक जलद झाले आहे.

गेमिंग

मोबाइलच्या वापरातील सर्वात लोकप्रिय भाग म्हणून गेमिंगकडे पाहिले जात आहे. यात परदेशी गेम्सचा भरणा असला तरी भारतीय बनावटीच्या तीन पत्ती व कार रन या गेम्सनीही या विभागात बाजी मारली आहे.

तीन पत्ती – ५० लाखांहून अधिक डाऊनलोड असलेला तीन पत्ती हा गेम सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये आपण मोबाइलसोबत तसेच आपल्या आसपासच्या मित्रांसोबत हा गेम खेळू शकतो. हा गेम विकसित करणाऱ्या कंपनीनेच इंडियन रमी नावाचा गेमही विकसित केला आहे. फावल्या वेळात पत्ते खेळणाऱ्या अनेकांनी आता या मोबाइल पत्त्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

कार रन – हा गेम म्हणजे खेळाडूचे वाहन चालवण्याचे कौशल्य तपासणारा आहे. आपण प्रत्यक्षात गाडी चालवत नसलो तरी गाडी चालवण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आपल्यात आहेत की नाही हे यातून तपासले जाते. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी आपली गाडी दिलेल्या रस्त्यांवरून वेगाने पळवायची आहे. यामुळे हा गेम केवळ रेसिंगचा नसल्याने लोकांच्या पसंतीस उतरला आहे. याचबरोबर या गेममध्ये डाव्या बाजूला चालक असलेल्या गाडय़ा असल्यामुळे आत्तापर्यंतच्या कार गेम्सपेक्षा हा वेगळा ठरला आहे.

मेसेजिंग

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सना टक्कर देऊन पुढे जाणे हे भारतात तरी मोठे आव्हान आहे; पण हे आव्हान हाइक या मेसेजिंग अ‍ॅपने स्वीकारले आहे. याला पर्याय म्हणून अनेक अ‍ॅप्स आले, मात्र त्यात हाइकनेच आपल्या वेगळेपणामुळे स्पध्रेत टिकाव धरला आहे. भारतीयांच्या भावना व्यक्त करता येणारे संदेशवहन अ‍ॅप म्हणून हाइकची विशेष ओळख आहे. भारतीय सणांसाठी खास स्टिकर्स या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. तसेच विविध भारतीय भाषांमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध आहे. या सर्व सुविधा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येण्यापूर्वीच हाइकमध्ये उपलब्ध आहेत. यात मोफत कॉलिंग आणि ऑफलाइन संदेशवहन सेवाही उपलब्ध आहे.

– नीरज पंडित

Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

First Published on December 6, 2016 5:32 am

Web Title: various app stores
Next Stories
1 अस्सं कस्सं? : हसता हुआ नूरानी चेहरा..
2 अ‍ॅपची शाळा : नकाशावाचन
3 कृत्रिम बुद्धिमत्तेची बाजी
Just Now!
X