स्मार्टफोन अधिक स्मार्ट होत असतानाच तो आपल्या अनेक गरजा समजून विकसित केला जाऊ लागला आहे. यामुळेच फोनचा वापरही स्मार्टपणाने होऊ लागला आहे. केवळ संवादासाठीच नव्हे तर कार्यालयीन कामकाज असेल, वैयक्तिक कामकाज असेल अशा प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोनचा वापर होऊ लागला आहे. ‘विवो’ने सोमवारी नवी दिल्लीत भारतीय बाजारात आणलेला विवो व्ही5 प्लस हे त्याचेच एक उदाहरण आहे.

स्मार्टफोन कितीही वापरकर्त्यांच्या सोयींचा विचार करून लक्षात घेतला तरी अजूनही अनेक सुविधांची त्यात कमी जाणवतच असते. यातील एक कमी म्हणजे आपला फोन हा एका हाताने वापरता येणे अनेकांना सोयीचे वाटते. तर अनेकांना मुख्य कॅमेरापेक्षा फ्रंट कॅमेरा अधिक जास्त मेगापिक्सेलचा हवा असे वाटते. अशा एक ना अनेक गोष्टींचा विचार करून विवोने सोमवारी भारतीय बाजारात विवो व्ही5 प्लस हा फोन बाजारात आणला. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे एका हाताने वापरता यावा अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये फ्रंट कॅमेराला विशेष महत्त्व देत डय़ुएल फंट्र कॅमेरा दिला आहे. नुसताच डय़ुएल कॅमेरा नव्हे तर तो तब्बल 20 मेगापिक्सेलचा आहे. यामुळे आता सेल्फीत रमणाऱ्या तरुणाईला अधिक चांगल्या प्रकारे स्वछायाचित्र टिपता येणार आहे व ते समाजमाध्यमांवर व्हायरल करता येणार आहे. तसेच आपण कोणत्या ठिकाणावरून हे छायाचित्र टिपले आहे हे समजण्यासाठी यामध्ये ‘जीओ टॅगिंग’ची सुविधाही देण्यात आली आहे. आपल्या फोनमध्ये सर्वोत्तम कॅमेरा आणि संगीत यामध्ये अग्रेसर राहणाऱ्या या कंपनीचा हा नवा फोन कसा आहे हे पाहुयात.

फोनची रचना- आपल्याला एका हाताने फोन वापरता यावा अशी अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता या फोनच्या रचनेमध्ये विविध स्तरावरचे बदल करण्यात आले आहे. या फोनची स्क्रीन ही 5.5 इंचाची पूर्ण एचडी देण्यात आली आहे. या फोनची जाडी अल्ट्रा नॅनो करण्यात आली आहे. यामुळे या फोनची जाडी १.७८ मिमी इतकीच आहे. तर याची उंची ७४ मिमी इतकी आहे. यामुळे हा फोन एका हाताने हाताळायला सोपा जाणार आहे. फोनला धातूची बॉडी देण्यात आली असून सर्व बाजू वर्तुळाकर आहेत. या फोनला पाचच्या पिढीची गोरीला ग्लास देण्यात आली आहे. एका हाताने फोन हाताळत असताना टाइप करणे सोपे जावे या उद्देशाने यामध्ये ‘वन हॅण्ड कीबोर्ड’चीही सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आपल्या होम स्क्रीनच्या एका कोपऱ्यात छोटी स्क्रीन तयार होते व त्यात कीबोर्ड सुरू होऊन आपण त्यात एका हाताने टाइप करू शकणार आहोत. यामुळे भविष्यात टाइप करण्यासाठी दोन्ही हात वापरण्याची गरज उरणार नाही.

कॅमेरा – या फोनचे वैशिष्टय़ हे याचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनला २० मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेल असे दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहे. यातील २० मेगापिक्सेलच्या कॅमेरामधून आपण उच्च दजऱ्ाचे रिझोल्यूशन मिळवू शकतो, तर आठ मेगापिक्सेलच्या कॅमेरामुळे छायाचित्रातील बारकावे टिपू शकतो. यात दोन्ही कॅमेरे स्वतंत्र वापरण्याची तसेच दोन्ही कॅमेरे एकत्र वापरण्याची सुविधा आहे. यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याच्या कॅमेरा सेटिंग्जमध्ये विशेष सुविधा देण्यात आल्या असून यातील ‘मूनलाइट ग्लो’ ही सुविधा नावीन्यपूर्ण आहे. ज्या फ्रंट कॅमेराला फ्लॅश नसतो अशा कॅमेरातून कमी उजेडात छायाचित्र टिपणे अवघड असते. तर ज्या फोनच्या फ्रंट कॅमेराला फ्लॅश आहे त्या फोनमधील छायाचित्र फ्लॅश पडलेला भाग अधिक प्रखरतेने दाखवतो. यामुळे छायाचित्राला पूर्ण न्याय मिळू शकत नाही. म्हणूनच कमी उजेडातही उत्तम छायाचित्र टिपणारे मूनलाइट ग्लो तंत्रज्ञान यात वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा फोन सेल्फीकरांसाठी अगदीच उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय फ्रंट कॅमेराने चेहऱ्याचे छायाचित्र चांगल्या प्रकारे टिपता यावे यासाठी यामध्ये फेस ब्युटी ६.० हे अतिरिक्त  फीचर देण्यात आले आहे. यामुळे यात छायाचित्र टिपणाऱ्या व्यक्तीचा चेहरा अधिक चांगल्या प्रकारे टिपला जातो. फ्रंट कॅमेरावर अधिक भर देत असतानाच या फोनचा मुख्य कॅमेराही काही कमी नसून तो १६ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. या फोनच्यामधील नवसंशोधनामुळे प्रथमच मुख्य कॅमेरा हा फ्रंट कॅमेराच्या तुलनेत कमी मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. यामुळे स्मार्टफोन बाजारात आता एक नवा पायंडा पडणार आहे.

संगीतानुभव- कॅमेरा आणि संगीत या दोन गोष्टींचा प्राधान्य असलेल्या या फोनमध्ये संगीत चांगल्या प्रकारे ऐकण्याची सुविधा नसणार असे होणारच नाही. या फोनमध्ये ‘एके4376’ म्युझिक चिपसेट वापरण्यात आली आहे. यामुळे संगीत अधिक चांगल्या प्रकारे ऐकणे शक्य होणार आहे. तर हेडफोनमधूनही चांगल्या प्रकारे संगीत ऐकायला मिळावे या उद्देशाने यामध्ये एक्स 680 हे हेडफोन देण्यात आले आहे. यामुळे अधिक चांगल्या प्रकारे हा फोन संगीतानुभव देऊ शकणार आहे.

काही त्रुटी – फोनमध्ये ज्या सुविधा देण्यात आल्या आहेत त्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी किमान आठ जीबी रॅम तसेच ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर हा फोन अत्याधुनिक फोनचा आदर्श ठरला असता.

इतर वैशिष्टय़े – या फोनमध्ये चार जीबी रॅम देण्यात आली आहे, तर ६४ जीबीची अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. तर फोन जलदगतीने काम करावा यासाठी स्नॅपड्रॅगन 625 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय फोनला फिंगर स्कॅन सुविधाही देण्यात आली आहे. तसेच फोनची बॅटरी ३०५५ एमएएच असून ती जलद चार्ज होण्यासाठी यात विशेष सुविधा देण्यात आली आहे. हा फोन सोनेरी रंगात देण्यात आला असून याची किंमत 27 हजार 980 रुपये आहे. फोनची पूर्व नोंदणी आज (२४ जानेवारी) पासून सुरू होणार असून फोन १ फेब्रुवारी रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे.

आम्ही केलेल्या सर्वेक्षणांमध्ये भारतीय बाजारात बहुतांश वापरकर्ते हे सेल्फीला अधिक महत्त्व देतात. तसेच त्यांना त्यांचे अनुभव तातडीने समाजमाध्यमांवर शेअर करणे आवडते. यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे सेल्फी काढता यावा या उद्देशाने डय़ुएल फ्रंट कॅमेरा फोन बाजारात आणला आहे. मुख्य कॅमेराचे मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरापेक्षा कमी असले तरी ते बाजारातील सर्वोत्तम आहे.

– विवेक झँग, मुख्य विपणन अधिकारी, विवो इंडिया

सेल्फीचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी पहिलावहिला २० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला फोन बाजारात आणला आहे. या फोनच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा स्मार्टफोन उत्पादनाला नवी दिशा देण्यात यशस्वी झालो आहोत.

– केंट चँग, मुख्याधिकारी, विवो इंडिया

नीरज पंडित –  nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com