भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने ७४९९ रुपये किंमतीचा कॅन्व्हास एक्सपी हा ४जी फोन बाजारात आणला आहे. यात इनबिल्ट ४जी तंत्रज्ञान आहे. मंगळवारपासून हा फोन स्नॅपडीलवर मिळण्यास प्रारंभ होईल. ५ इंचाचा एचडी स्क्रिन असलेल्या या फोनमध्ये १ गेगाहर्टस् क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ३जीबी रॅम आणि १६ जीबीची अंतर्गत मेमरी पुरविण्यात आली आहे. स्नॅपडीलवर कॅन्व्हास एक्सपी हा फोन विक्रीसाठी सादर करून आम्ही वापरकर्त्याला एक शक्तिशाली ४जी स्मार्टफोन उपलब्ध करून देत असल्याचे मायक्रोमॅक्सचे मुख्य विपणन अधिकारी शुभजीत सेन म्हणाले. मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये मागील बाजूस ८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पुढील बाजूस २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. अॅण्ड्रॉइड ५.१ लॉलीपॉप प्रणालीवर कार्य करणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये २००० एमएएच बॅटरी बसविण्यात आली आहे.