जगभरातील सव्वा अब्ज लोकांकडून वापरलं जात असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे निर्विवादपणे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. केवळ भारतातच या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या २० कोटींच्या घरात आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वापरकर्ते असतानाही व्हॉट्सअ‍ॅपचं स्वत:ला अपडेट करणं अजिबात कमी झालेलं नाही. वापरकर्त्यांकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना, प्रतिक्रिया आणि तंत्रज्ञानात होणारी प्रगती यांचा विचार करून साधारण आठवडा-दोन आठवडय़ांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अपडेट होतच असतं. चालू वर्षांतही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक बदल झाले आहेत. यातील काही बदल दृश्य असल्याने त्यांच्याबाबत वापरकर्त्यांना तातडीने माहिती मिळते व ते त्याचा वापरही करतात. परंतु, काही अशाही सुधारणा आहेत, ज्या असूनही त्यांच्या वापराबाबत अनभिज्ञता असते. अलीकडच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झालेल्या अशाच काही महत्त्वाच्या सुधारणा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टेट्स’मध्ये आमूलाग्र बदल – ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये झालेला सर्वात लक्षणीय बदल म्हणजे ‘स्टेटस’. त्याआधीपर्यंत ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे ‘स्टेटस मेसेज’ हे केवळ मजकुरांपुरते मर्यादित असायचे. पण आता तुम्ही छायाचित्रे, जिफ फाइल, व्हिडीओ यापैकी काहीही तुमची ‘स्टेटस’ म्हणून ठेवू शकता. एकावेळी अनेक फोटो निवडून त्यांचा ‘स्लाइड शो’देखील स्टेटस म्हणून ठेवता येतो. हा स्टेटस संदेश २४ तासांपुरता असतो. त्यानंतर तो आपोआप गायब होतो. मग तुम्ही पुन्हा नवीन स्टेटस ठेवू शकता. या बदलाला वापरकर्त्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

जुनी ‘स्टेटस’ पण कायम – ‘स्टेटस’च्या रचनेत आमूलाग्र बदल केल्यानंतर पूर्वीची मजकुरापुरती मर्यादित आणि ‘डीपी’सोबत दिसणारी ‘स्टेटस’ची पद्धत व्हॉट्सअ‍ॅपने बंद केली होती. पण वापरकर्त्यांकडून त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर नव्या स्टेटस सोबत जुनी स्टेटसही कायम ठेवण्यात आली.

 एकावेळी जास्त ‘शेअरिंग’ – पूर्वी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून एकाच वेळी जास्तीतजास्त दहा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करता येत होते. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरापुढे ही संख्या अपुरी पडू लागल्यानंतर या वर्षांच्या सुरुवातीपासून एकाच वेळी जास्तीतजास्त  ३० फाइल्स शेअर करण्याची सुविधा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने दिली.

चुकून पाठवलेला मेसेज रद्द – हा खरंतर अतिशय महत्त्वाचा बदल असून अद्याप तो सर्वच स्मार्टफोनवर उपलब्ध झालेला नाही. या सुविधेमुळे तुमच्याकडून पाठवण्यात आलेला एखादा मेसेज तुम्हाला रद्द करता येतो. अर्थात तो मेसेज ‘अनसेंड’ असेल किंवा अपलोड झाला नसेल तोपर्यंतच तुम्ही तो ‘रिकॉल’ किंवा रद्द करू शकता.

द्विस्तरीय पडताळणी – या वर्षी फेब्रुवारीमध्ये उपलब्ध झालेली ही सुविधा आता कुठे वापरकर्त्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. या सुविधेनुसार वापरकर्त्यांला आपल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अकाउंट’मधील ‘टू स्टेप्स व्हेरिफिकेशन’चा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर या ठिकाणी एक सहा अंकी पासकोड नोंदवावा लागतो. हा पासकोड एकदा निश्चित झाल्यानंतर तुम्ही निश्चिंत होऊ शकता. कारण त्यामुळे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप ‘हॅक’ करणे कुणालाही सहजासहजी शक्य होणार नाही.

कोणतीही फाइल ट्रान्स्फर – व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्ही आतापर्यंत फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत होता. त्यानंतर त्यावरून ‘डॉक्युमेंट’ फाइल आणि ‘जिफ’ फाइल पाठवण्याची सुविधाही आली. पण आता तुम्ही ‘एमपी३’, ‘एपीके’ अशा फाइलही पाठवू शकता. अँड्रॉइडवरून अशा १०० एमबीपर्यंतच्या तर आयफोनवरून १२८ एमबीपर्यंतच्या फाइल पाठवण्याची सुविधा आहे.

फोटो बंडलिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग – आतापर्यंत वापरकर्त्यांनी एकाच वेळी अनेक फोटो पाठवले तरीही हे सगळे फोटो एक एक करूनच पाहावे लागत होते. मात्र, आयफोनवर नव्याने सुरू झालेल्या सुविधेनुसार तुम्ही काही फोटोंचा एकत्रित आल्बम तयार करून आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता. त्यामुळे समोरची व्यक्ती जेव्हा ही फाइल ओपन करेल, तेव्हा त्याला सर्व फोटो एकाच पानावर पाहायला मिळतील.

याशिवाय तुम्ही एखादा व्हिडीओ डाउनलोड होता होताच पाहू शकता. ही सेवा जवळपास सर्वच प्रकारच्या मोबाइलवर उपलब्ध झाली आहे.

‘नाइट मोड’ – आयफोनवर अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने ‘नाइट मोड’ची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे अंधारात एखादे छायाचित्र काढताना कॅमेरा आपोआप प्रकाशात सुधारणा करतो.

मराठीतील सर्व टेकKNOW बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp introduced useful new feature
First published on: 11-07-2017 at 01:17 IST