घरगुती गणेशमूर्तीची संख्या एक लाख ४० हजारांवर

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांत शुक्रवारी एक लाख ४२ हजार ७८ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यामध्ये घरगुती गणेशमूर्तीची संख्या एक लाख ४१ हजार २० इतकी असून सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती एक हजार ५८ इतक्या आहेत. गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी मिरवणुका काढणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तसेच दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. मागील वर्षांमध्येही सणासुदीच्या दिवसानंतरच करोनाची रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे यावर्षीही तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही जिल्ह्यत गणरायाच्या पाहुणचाराचा उत्साह कायम आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात शुक्रवारी १ लाख ४२ हजार ७८ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यामध्ये १ हजार ६० सार्वजनिक आणि १ लाख ४१ हजार २० घरगुती गणेशमूर्तीचा सामावेश आहे. तर १५ हजार ७१७ घरांमध्ये गौरींचे आगमन होणार आहे.

गणेशोत्सव काळात करोना नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात एकूण पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ८०० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासह दीड हजार गृहरक्षक आणि राज्य राखीव पोलीस दलाची ५० जणांची तुकडीही तैनात असणार आहे. मिरवणुकांना बंदी असल्याने सर्वच मुख्य रस्ते, चौकात पोलिसांची पथके तैनात असणार आहेत. भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. त्यामुळे गर्दी करून करोना नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.