भाजपच्या २८ टक्के, तर शिवसेनेच्या २० टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे

 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये निवडून येणारा नगरसेवक चांगल्या पाश्र्वभूमीचा, जनतेची कामे करणारा असावा, असे सामाजिक संस्थांसह नागरिकांनाही वाटत आहे. मात्र निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जापैकी १६ टक्के उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये भाजपच पहिल्या क्रमांकावर असून शिवसेनेचा क्रमांक त्याखालोखाल लागत आहे.

७४१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे एका खासगी सामाजिक संस्थेकडून विश्लेषण करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे १२१ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. ही संख्या एकूण उमेदवारी अर्ज भरलेल्या संख्येच्या १६ टक्के असून यामध्ये सत्तेचा दावा सांगणाऱ्या शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा आकडा लक्षणीय असाच आहे. तब्बल ९५ उमेदवार हे गंभीर गुन्ह्य़ांमध्ये अडकले असून एकूण संख्येच्या तुलनेत ही संख्या १३ टक्के इतकी मोठी आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटीचे रुपडे देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपच्या तब्बल २८ टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर शिवसेनेचे २० टक्के उमेदवार वादग्रस्त आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्य़ांची त्यांच्यावर नोंद आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१५च्या निवडणुकांसाठी ७५३ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यापैकी ७४१ उमेदवारांच्या अर्जाची विश्लेषण ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स’ या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे चालवण्यात येणाऱ्या ‘कल्याण-डोंबिवली निवडणूक २०१५’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हे विश्लेषण या संस्थेने केले आहे.

 

भाजपच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीदरम्यान संधी मिळाली असून अनेक र्वष विरोधात असल्याने आंदोलने, मोर्चात हे कार्यकर्ते सहभागी होतात. त्यांच्यावर राजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची गुन्हे असल्याची संख्या जास्त दिसत असण्याची शक्यता आहे.    – आ. नरेंद्र पवार, भाजप

 

शिवसेना नेहमीच अनेक राजकीय आंदोलनामध्ये सहभागी होत असून नागरिकांचे प्रश्न, समस्या मांडताना केलेल्या आंदोलनाप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल असतात. त्यामुळे गुन्ह्य़ाच्या कारणांची माहिती घेणेही आवश्यक आहे.

– गोपाळ लांडगे, शिवसेना नेते

 

२८भाजप उमेदवार

 

२६शिवसेना            उमेदवार

२१ मनसे             उमेदवार

 

१४ गंभीर गुन्हे

 

०९काँग्रेस       उमेदवार०४बसप         उमेदवार

 

०७ गंभीर गुन्हे ०४ गंभीर गुन्हे

 

पक्ष    उमेदवार गंभीर गुन्हे

राष्ट्रवादी ३      ३

बविआ  १      –

एआयएफबी     १      १

सीपीआय       १      –