स्ट्रेचर हमालांच्या कमतरतेमुळे जखमींवर उपचार नाहीत

‘रूळ ओलांडणे धोकादायक आहे’, ‘रूळ केवळ रेल्वेगाडय़ांसाठी असतात, माणसांसाठी नव्हे’ अशा प्रकारे जनजागृती नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र तरीही रेल्वेरूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी होत नाही. वसई-विरार रेल्वेमार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून सर्वाधिक अपघात रूळ ओलांडताना होत असल्याचे समोर आले आहे. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल २३३ जणांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला असून त्यापैकी १२९ जणांचा मृत्यू रूळ ओलांडताना झाला आहे. रेल्वे स्थानकात हमालांची कमतरता असल्यामुळे जखमी प्रवाशांना वेळीच उपचार मिळत नाहीत आणि त्यांचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नालासोपारा, मीरा रोड आदी रेल्वे स्थानकात एकही अधिकृत हमाल नसल्याचे उघड झाले आहे.

मीरा रोड ते वैतरणा दरम्यानच्या सात रेल्वे स्थानकांचा वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारित समावेश होतो. पश्चिम रेल्वेवरील  ही स्थानके सर्वाधिक गर्दीची मानली जातात. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही जास्त होते. १ जानेवारी २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ या अकरा महिन्यांत या मार्गावर २३३ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी १२९ प्रवाशांचा मृत्यू हा रूळ ओलांडताना झाला. मागील वर्षांच्या तुलनेत या संख्येत किंचितशी घट झाली असली तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. मागील वर्षी २०१५ मध्ये २४९ प्रवाशांचा विविध रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यापैकी १३९ जणांचा मृत्यू हा रेल्वे रूळ ओलांडताना झाला होता. ६३ प्रवाशांचा मृत्यू गाडीतून पडून झाला होता तर १४५ प्रवासी हे गाडीतून पडून जखमी झाले होते.

हमालाच्या कमतरतेमुळे मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. याबाबत बोलताना वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले की रेल्वेने प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका ठेवली आहे. मात्र हमालांची कमतरता जाणवते. अधिकृत हमाल नसल्याने जखमींना वेळेवर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करता येत नाही. वसई रोड रेल्वे स्थानकात दोन अधिकृत हमाल आहेत. मात्र नालासोपारा, नायगाव आणि मीरा रोड स्थानकात एकही अधिकृत हमाल नाही. यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकातील गर्दी वाढत असली तरी प्रवाशांनी आपली सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवास करावा. रेल्वेने सर्व रेल्वे स्थानकात रेल्वे पुलांची संख्या वाढवली आहे, तसेच सरकते जिनेही लावण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी शॉर्टकटचा अवलंब न करता या पुलांचा वापर केला तर अपघात कमी होतील.

– महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे</strong>