ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात १५ ढोकरी बगळ्यांचा (पाँड हेरॉन) संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. मात्र, देशात ‘बर्ड फ्लू’मुळे पक्ष्यांचा मृत्यू होत असतानाच समोर आलेल्या या घटनेने चिंता वाढवली आहे.

वाघबीळ येथील विजय नगरी भागात छोटा तलाव आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात ढोकरी बगळे येत असतात. बुधवारी सकाळी येथील स्थानिक रहिवाशांना रस्त्याकडेला हे बगळे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती पशुसंवर्धन अधिकारी आणि ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या वेळी १५ बगळ्यांचे मृतदेह त्यांना आढळले. यातील काही बगळ्यांचे मृतदेह चिरडलेले आणि खराब अवस्थेत होते. या सर्व बगळ्यांचे नमुने पथकांनी गोळा केले आहेत. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची तपासणी करण्यासाठी हे नमुने पुण्यात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच या बगळ्यांचा मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून देशातील केरळ, मध्य प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रसार सुरू आहे. त्यातच या पक्ष्यांच्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण आहे.

बर्ड फ्लूचा धोका नाही

पशुसंवर्धन विभागाचे ठाणे जिल्हा उपायुक्त व्ही. व्ही. धुमाळ यांना बर्ड फ्लूच्या जिल्ह्य़ातील प्रसाराबद्दल विचारले असता, जिल्ह्य़ात बर्ड फ्लूचा अद्याप कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक सध्या मांस खाऊ शकतात. तसेच कोंबडय़ांचे मांस शिजवून खाल्ल्यास हा बर्ड फ्लूचा विषाणू नष्ट होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘सकाळचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो असता, हे बगळे मृतावस्थेत आढळले. त्यानंतर आम्ही याची माहिती प्रशासनाला दिली,

 – गोपाळ साबे, विजय नगरी, रहिवासी

राज्यात बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण आढळले नसले तरी अशा प्रकारे पक्ष्यांचा मृतदेह आढळल्यास नागरिकांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे.

डॉ. सुधीर गायकवाड, पक्षी निरीक्षक