महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात नागरिकांची एकजूट
डोंबिवली पूर्व परिसरातील आयकॉन रुग्णालय ते गांधीनगर रस्त्याचे रुंदीकरण, तसेच या भागातील गटारे तयार करण्याचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. या रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असणारी ३० ते ३५ वर्षांपूर्वीची जुनी झाडे कापली जाणार आहेत. अनेक वर्षांपासून वाढवलेली, जतन केलेली वृक्षराजी महापालिकेकडून तोडण्यात येत असल्याने या भागातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रहिवाशांनी संघटित होऊन कोणत्याही परिस्थितीत झाडे तोडू दिली जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या रस्त्यावर माड, अशोक, आंबा अशी नानाविध प्रकारची झाडे आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना सतत आल्हाददायक अनुभव वाटसरूंना येत असतो. या भागातील रहिवाशांनी पुढाकार घेऊन या झाडांचे रोपण केले आहे तसेच ती जगवली आहेत.
ठेकेदाराने गटार तयार करताना सुरुवातीला रहिवाशांच्या नकळत दोन झाडे तोडली. ही बाब या भागातील रहिवासी ‘व्हिजन डोंबिवली’चे कार्यकर्ते डॉ. नितीन जोशी, संरचनात्मक अभियंता माधव चिकोडी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने गटारेकामाच्या ठेकेदाराला झाडे तोडण्यास विरोध केला. महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क करून, ‘तुम्ही गटारे बांधा, रस्ता रुंदीकरण करा, पण या भागातील झाडांवर गंडांतर आणू नका,’ असे डॉ. जोशी यांनी ठणकावून सांगितले. रहिवाशांचा तीव्र विरोध पाहून अखेर ठेकेदाराने झाडे तोडण्याचे काम थांबविले.
काम पूर्ण करायचे असल्याने रहिवासी सोसायटीच्या आवारातून गटार तयार करण्यास जागा देतील का, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्याने केला. त्या वेळी रहिवाशांनी सोसायटीतून गटार काढा पण झाडे तोडू नका, असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. या रस्त्याच्या कडेची झाडे ही या भागातील रहिवाशांनी जोपासली आहेत. त्यामुळे त्यावर कुऱ्हाड चालवू देणार नाही, अशी स्पष्ट भूमीका येथील गांधीनगर येथील रहिवाशांनी घेतल्याने ठेकेदाराची कोंडी झाली असून पालिका यावर काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गांधीनगरमधील रहिवाशांनी झाडे लावून जगवली, वाढवली. आता ही झाडे पालिकेच्या रस्तारुंदीकरण, गटारांना अडथळा ठरु लागली आहेत. म्हणून झाडांवर लगेच कुऱ्हाड चालवायचे काम हाती घेण्यात आले, हे चुकीचे आहे.
डॉ. नितीन जोशी, कार्यकर्ता, व्हिजन डोंबिवली