ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात गुरुवारी आणखी चौघांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. नव्याने लागण झालेल्या रुग्णांपैकी तिघे जणं पॉजिटीव्ह रुग्णाचे नातेवाईक असून…एक मुंबई महापालिकेत कर्मचारी आहे. बदलापूर शहरात रुग्णांची संख्या आता २९ वर पोहचली आहे. नव्याने बाधित झालेल्या रुग्णांपैकी दोन पुरुष तर दोन महिला आहेत. शहरातील रमेशवाडी, बेलवली, बदलापूर गाव आणि दत्तवाडी या परिसरात हे नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत बदलापुरात एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झालेला असून ६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. २२ जणांवर अजुनही रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाने दिली आहे.

याआधी, शहरात दोन करोनाबाधित रुग्ण सापडले होते. मुंबईतील नायर रुग्णालयात कार्यरत नर्स आणि टाटा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्लंबरला करोनाची लागण झाली होती. बदलापुरातील अनेक व्यक्ती या मुंबईत कामासाठी जात आहेत. दररोजच्या प्रवासात या व्यक्ती करोना बाधित क्षेत्रातून जात असल्यामुळे यांना संसर्गाचा धोका असतो. या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची जबाबदारी शासनाने करावी अशी मागणी आता होताना दिसत आहे. याआधीही बदलापुरात पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व मुलगी आणि मुंबई महापालिका व रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.