अंबरनाथ, बदलापूर या शहरांमधील करोना संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल येण्यास लागणारा विलंब संशयितांच्या जीवावर बेतत असून हे रोखण्यासाठी येत्या दहा दिवसांत अंबरनाथ, बदलापूर या शहरांबरोबरच भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागासाठी पाच चाचणी केंद्रे सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिले.

ठाणे जिल्ह्य़ातील करोनाचा वाढता फैलाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी गुरुवारी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत बैठक घेतली. त्यांनी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील करोना परिस्थितीचाही आढावा घेतला. दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने टाळेबंदीचा पर्याय योग्य नसल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वेळी व्यक्त केले.