शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी खासगी कंपनीचा पुढाकार

आशीष धनगर, लोकसत्ता

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने खासगीकरणाचा मार्ग अनुसरला असून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हवा शुद्धीकरणासाठी ५०० यंत्रे बसविली जाणार आहेत. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव कंपनीने कल्याण डोंबिवली महापालिकेला सादर केला असून सुरुवातीच्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर शहरातील ४ ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या यंत्रांमुळे शहरातील हवा प्रदूषणामध्ये घट होईल, असा दावा केला जात आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील हवा मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाली असून शहरातील २५ ठिकाणे अतिप्रदूषित असल्याचे निरी संस्थेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. या पाहणीत निसर्गरम्य समजल्या जाणाऱ्या टिटवाळा आणि आंबिवली या उपनगरांचाही समावेश असल्याने शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या प्रदूषणाचे केवळ मोजमाप करण्याच्या पलीकडे कोणतेही ठोस उपाय महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. शहरात वाढणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी ‘स्ट्राटा इनव्हायरो’ या खासगी कंपनीने

पुढाकार घेतला आहे. या कंपनीमार्फत शहरातील विविध ठिकाणी हवा शुद्धीकरणासाठी ५०० यंत्रे बसविण्यात येणार असून ही यंत्रे बसवण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव कंपनीने महापालिका प्रशासनापुढे सादर केला आहे. ही सर्व यंत्रे बसविण्यासाठी महापालिकेला कोणताही खर्च येणार नसून हा सर्व खर्च ‘स्ट्राटा इनव्हायरो’ ही कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारणार आहे. तसेच यासाठी कल्याण डोंबिवली शहरातील इतर खासगी कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे. सुरुवातीला कल्याण येथील शिवाजी महाराज चौक, कल्याण रेल्वे स्थानक परिसर तसेच डोंबिवली येथील फडके रस्ता आणि रेल्वे स्थानक परिसर या चार ठिकाणी प्रत्येकी पाच यंत्रे प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात येणार असून त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी ही अशी ५०० यंत्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील हवेचा दर्जा सुधारणार असून नागरिकांना श्वसनासाठी स्वच्छ हवा उपलब्ध होणार आहे, असा दावा केला जात आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी ‘स्ट्राटा इनव्हायरो’ कंपनी मार्फत ५०० यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सुरुवातीला शहरातील ४ ठिकाणी ही यंत्रे प्रायोगिक तत्त्वावर बसविणार असून महापालिकेच्या सूचनेप्रमाणे पुढील यंत्रे बसविण्याचे काम करण्यात येईल.

– अमोल चाफेकर, संचालक, स्ट्राटा इनव्हायरो

या ठिकाणी यंत्रे

निरी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील २५ ठिकाणे अतिप्रदूषित असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये कल्याण-बदलापूर रस्ता, कल्याण शिळफाटा रस्ता, सुभाष रोड, शंकेश्वर रोड, एच-एन रोड, ओमेगा इंडस्ट्री, के.बी. इंडस्ट्री, डॅस्कम इंडस्ट्री, केडीएमसी वॉटर प्लॉन्ट, सिनेमॅक्स, मच्छी मार्केट, गणेशनगर, हनुमाननगर, ठाकुरवाडी, बिर्ला महाविद्यालय, आयकॉन रुग्णालय, रेल्वे स्थानक परिसर, कोपर रेल्वे स्थानक परिसर, कल्याण निर्मल रस्ता, दुर्गाडी चौक, टिटवाळा मंदिर, टिटवाळा आंबिवली रस्ता आणि कल्याण सापे रस्ता या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी हवा शुद्धीकरणासाठीची यंत्रे बसविण्यात येणार आहे.