एचडीएफसी बँकेतील ५१ लाखांची लूट

वसईच्या एचडीएफसी बँकेच्या ५१ लाख रुपयांची रोकड पळवल्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या टोळीचा म्होरक्या अन्य कुणी नसून बँकेचाच लेखापाल होता. ओमप्रकाश गायकवाड असे त्याचे नाव असून वालिव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या टोळीने गेल्या तीन वर्षांत बँकेच्या अडीच कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे तपासात पुढे आले आहे.

२१ डिसेंबर रोजी कामण येथे बँकेची रोकड घेऊन कर्मचारी आणि सुरक्षारक्षक एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी निघाले होते. त्या वेळी सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस या कंपनीची गाडी होती. गाडी कामण येथे आली असता बँकेचा अभिरक्षक स्वप्निल जोगळे (२९) याने इतरांना चकमा देत गाडीतील ५१ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत रायगड पोलिसांच्या मदतीने स्वप्निलची पत्नी पूर्वा जोगळे (२६) आणि भाऊ सागर जोगळे (२३) यांना अटक केली होती. नंतर पुण्याहून स्वप्निललाही अटक करण्यात आली.

वालिव पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. त्यांच्या चौकशीत मोठा धक्कादायक खुलासा झाला. हा प्रकार केवळ एका लुटीचा नव्हता तर गेल्या तीन वर्षांपासून बँकेच्या पैशांचा अपहार केला जात होता. याचा सूत्रधार होता बँकेचा लेखापाल ओमप्रकाश गायकवाड. तो स्वप्निल जोगळे याच्या मदतीने एटीएममध्ये भरावयाच्या पैशांचा अपहार करायचा.

त्याचा बनावट हिशोब बँकेला सादर करायचा. त्यामुळे बँकेला कधीसंशय आला नाही. या आरोपींनी दोन कोटी ६४ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केला होता. त्यांच्याकडून ८९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.