भगवान मंडलिक

डोंबिवलीतील तरुणाची कामगिरी; ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे सहकार्य

डोंबिवलीतील तरुण निसर्ग आणि पक्षीप्रेमी वेदांत राजू कसंबे याने नवी मुंबई खाडीकिनारी भ्रमंती करून एक दिवसात एक हजारांहून अधिक स्थलांतरित, स्थानिक पक्ष्यांची टेहळणी करून त्यामधून ५७ ‘खूण’ (पक्ष्यांच्या पायाला फ्लॅग, रिंग) केलेले पक्षी शोधण्याची कामगिरी केली. एक दिवसात एवढे ‘खूण’ केलेले पक्षी शोधण्याचा हा पहिलाचा प्रयत्न असल्याचा दावा पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. मुंबईतील ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएचएनएस) आयोजित भ्रमंतीमधून वेदांतने हे पक्षी निरीक्षणाची भ्रमंती पार पाडली.

वेदांत कसंबे डोंबिवलीतील रहिवासी आहे. तो ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयात शिक्षण घेऊन नुकतीच बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. वयाच्या सहाव्या वर्षांपासून वेदांतला पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे साहाय्यक संचालक वडील डॉ. राजू कसंबे यांचे वेदांतला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. ‘बीएचएनएस’तर्फे नवी मुंबईत सी-वूडजवळील टीएस चाणक्य तलाव, खाडी परिसरात वेदांत व त्याचे वडील डॉ. राजू कसंबे यांनी सकाळपासून ते सूर्यास्तापर्यंत गेल्या सप्ताहात भ्रमंती केली. या दिवसभराच्या भ्रमंतीत वेदांतने जवळील कॅमेऱ्यातून तलाव काठ, परिसरातील स्थानिक, स्थलांतरित एक हजार पक्ष्यांची छायाचित्रे काढली. हे पक्षी तलावाकाठी, दलदलीत, झाडांवर, पाण्यावर बसलेले आढळले. दूर अंतरावरून पक्ष्यांचे दर्शन घडत असल्याने त्यांच्या पायाला ओळखीसाठी फ्लॅग (झेंडा खूण), रिंग (अंगठी) आहे का हे शोधण्याचा प्रयत्न वेदांतने कॅमेरा, दुर्बिणीच्या माध्यमातून केला. येथे फ्लेमिंगो, स्थलांतरित लेसर सॅन्डप्लॉवर पक्षी आढळले. लेसरच्या पायाला खुणा आढळल्या. एका पायात फ्लॅग, दुसऱ्या पायात रिंग होती. हे पक्षी कोठे, कोणत्या काळात स्थलांतर करतात. किती अंतरावरून ते येतात. याची माहिती या खुणेवरून मिळते. असे खूण केलेले पक्षी आढळले नाही तर त्यांचा अधिवास कोठे असेल याचा अभ्यास करणे, असा निसर्गानुभव या माध्यमातून घेता येतो, असे वेदांतने सांगितले. एक हजार छायाचित्रांची बारकाईने पाहणी

केली, त्यामधील ५७ पक्ष्यांच्या दोन्ही पायांना फ्लॅग (क्रमांक असलेली झेंडा खूण), दुसऱ्या पायात रिंग (अंगठी) आढळली. ‘बीएचएनएस’ने यापूर्वी खुणा केलेले हे सर्व पक्षी असल्याचे तपासानंतर स्पष्ट झाले, असे वेदांतने सांगितले.

‘बीएचएनएस’च्या पक्षी निरीक्षण पथकाने गेल्या वर्षभरात चार हजार विविध प्रकारच्या पक्ष्यांना फ्लॅग, रिंग बसविले आहेत. राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे संस्थेने पक्ष्यांना रंगीत फ्लॅग, रिंग आणि मानेला कंठी (नेक कॉलर) बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. खुणा असलेल्या पक्ष्यांविषयी पाच खंडातील २९ देशांमधून पक्षीप्रेमींकडून माहिती पाठवली जात आहे. एक दिवसात ५७ टॅग केलेले पक्षी वेदांतने शोधले.अधिकाधिक पक्ष्यांची माहिती एका ठिकाणी सहज उपलब्ध व्हावी म्हणून पक्षी निरीक्षकांनी फ्लॅग असलेल्या पक्ष्यांची काढलेली छायाचित्रे‘बीएएनडीएस@बीएचएनएस.ओरजी’ येथे पाठवावीत. या निमित्ताने फ्लॅग असलेल्या पक्ष्यांचे समग्र संकलन एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यांचा अधिवास कळणे सोपे होईल, असे ‘बीएचएनएस’च्या जनसंपर्क अधिकारी बिल्वदा काळे यांनी सांगितले.