23 September 2020

News Flash

ठाण्यातील बांधकाम प्रकल्प नवी संसर्गक्षेत्रे

एकाच ठिकाणी ८६ मजूर बाधित; बांधकामे थांबविण्याचे आयुक्तांचे आदेश

एकाच ठिकाणी ८६ मजूर बाधित; बांधकामे थांबविण्याचे आयुक्तांचे आदेश

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत करोना फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना शहरातील मोठय़ा बांधकाम क्षेत्रांत विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र पुढे आले आहे.

घोडबंदर मार्गावरील एका मोठय़ा बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे ८६ मजूर बाधित आढळले आहे. त्यानंतर ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नोटिसा बजावत तूर्त बांधकामे थांबवण्याचा आदेश दिला आहे.

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यांतील अनेक शहरांमधील करोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच पालिका आयुक्तांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टाळेबंदी, चाचण्या वाढविणे, सर्वेक्षणाची विशेष मोहीम हाती घेणे यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील काही शहरांमधील करोनाबाधितांचा आकडा स्थिरावला असला तरी

तो अद्यापही लक्षणीयरित्या घटलेला नाही. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर या शहरांमध्ये धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार संक्रमित क्षेत्रात सर्वेक्षण, प्रतिजन चाचण्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर, अलगीकरणाची संख्या वाढविणे असे काही उपायही योजले जात असताना ठाणे पालिका क्षेत्रात सुरु असलेली बांधकाम ठिकाणे आता करोनाबाधितांचे संसर्गक्षेत्र ठरू लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. टाळेबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर बांधकाम मजूर गावी गेले असले तरी ठाण्यासारख्या शहरात हजारोंच्या संख्येने मजुरांच्या तात्पुरत्या वस्त्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी उभ्या आहेत. बांधकामे सुरु करण्यापूर्वी या मंजुरांच्या चाचण्या केल्या जाव्यात, तसेच अंतरसोवळे तसेच इतर नियमांचे पालन केले जावे अशा सक्त सूचना यापूर्वीच व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. असे असताना महापालिका हद्दीत विशेषत घोडबंदर पट्टयात सुरु असलेल्या मोठय़ा बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे महापालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

५२ व्यावसायिकांना नोटीसा

घोडबंदर भागातील एका मोठय़ा बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी ५०० पेक्षा अधिक मजूर दाटीवाटीने आणि कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर टाळत वास्तव्य करत असल्याचे धक्कादायक चित्र नुकतेच उघडकीस आले. महापालिकेने या मजुरांची चाचणी केली असता या वस्तीत ८६ मजूर करोनाबाधित आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर येथील उर्वरीत ४०० पेक्षा अधिक मजुरांना तातडीने अलगीकरण केंद्रात हलविण्यात आले असून इतर बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी काम करत असलेल्या मजुरांचे चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत बांधकाम थांबविण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार पन्नासपेक्षा अधिक मोठय़ा बांधकाम प्रकल्पांची कामे थांबविण्यात आली असून याठिकाणी मजुरांच्या चाचणीसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 4:52 am

Web Title: 86 construction laborers test positive for coronavirus in thane zws 70
Next Stories
1 भिवंडीत महिलेवर सामूहिक अत्याचार
2 ठाणे : डिओड्रंट आणि चॉकलेट उधार दिले नाही म्हणून दुकानदारावर खुनी हल्ला
3 कल्याणमध्ये ‘मटका किंग’ची गोळ्या झाडून हत्या, आरोपींचा शोध सुरू
Just Now!
X