सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानंतरही गॅस एजन्सीची आधारकार्डासाठी ३१ डिसेबरची मुदत
घरगुती गॅस सिलिंडर अनुदानासाठी आधारकार्डची सक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले असतानाही कल्याणमध्ये एका गॅस सिलिंडर एजन्सीने ज्यांना सिलिंडर अनुदान घ्यायचे आहे, त्यांनी आपल्या आधारकार्डची प्रत ३१ डिसेंबपर्यंत एजन्सीच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन केले आहे. हे आवाहन एजन्सींच्या प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
केंद्र शासनाच्या नैसर्गिक वायू व पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील सर्व घरगुती सिलिंडर पुरवठादारांना ३१ डिसेंबपर्यंत ग्राहकांकडून आधारकार्ड जमा करून घ्या, तसेच ज्या ग्राहकांनी आधारकार्ड एजन्सीत जमा केले असेल, त्यांना गॅस अनुदानाची सूट मिळेल, असे तोंडी कळविले आहे. या तोंडी आदेशामुळे गॅस एजन्सीचालक हवालदिल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच यासंबंधी निर्देश दिल्यानंतर अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सीत सिलिंडरवरील सरकारी अनुदान मिळण्यासाठी आधारकार्ड जमा केले नाही.
देशातील एकूण सुमारे ८० टक्के ग्राहकांनी गॅस अनुदानासाठी आधारकार्ड एजन्सीत जमा केले आहे. अद्याप सुमारे ४० ते ५० लाख ग्राहकांनी आधारकार्ड गॅस एजन्सीत जमा केलेले नाही. सरकारच्या आदेशामुळे या उर्वरित ग्राहकांना आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी आधारकार्ड केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्याचा शोध ग्राहकांना घ्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारने एक महिन्याची मुदत देऊन ग्राहकांना आधारकार्ड एजन्सीत जमा करण्यास सांगितल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या संतप्त प्रश्नांना उत्तरे देताना एजन्सीचालकांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.
सिलिंडर पुरवठा, कार्यालयातील प्रशासकीय कामकाजासोबत आधारकार्ड जमा करण्याचे नवे खूळ केंद्र सरकारने काढल्याने एजन्सीचालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आधारकार्डामुळे कोणतेही सरकारी अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते. याचा अनुभव सरकारी विभागांना येऊ लागला आहे. त्यामुळे कृषी, मनरेगा, सिलिंडर व इतर अनुदान देणाऱ्या योजनांसाठी सरकार आधारकार्ड सक्तीचे करू पाहत आहे. न्यायालयाचा अडसर असल्यामुळे केंद्र सरकारलिखित स्वरूपात याबाबत काही म्हणून शकत नाही, असे एका एजन्सीचालकाने सांगितले.

आधारकार्ड जमा होण्याची शक्यता कमी
ज्या ग्राहकांजवळ आधारकार्ड नाही त्यांनी ते काढून घेणे, ते एजन्सीत जमा करणे यामध्ये बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबपर्यंत ग्राहकांकडून आधारकार्ड एजन्सीत जमा होण्याची शक्यता कमीच आहे, असे अनेक गॅस एजन्सीचालकांनी सांगितले.