|| सागर नरेकर

विशेष मुलांनाही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच जगण्याचा अधिकार असतो. घरामध्ये ही मुले एकटी पडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपल्यानंतर काय असा प्रश्न या मुलांच्या पालकांना पडलेला असतो. अशा मुलांना सुरक्षितपणे आणि आनंदाने जगता यावे म्हणून बदलापूरपासून काही अंतरावरील मुळगावात १९९४ मध्ये आधार नावाची संस्था स्थापन झाली. सध्या इथे २५० हून अधिक भिन्नमती मुले राहत आहेत. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या या संस्थेविषयी..

‘आईकडून मतिमंद मुलाची हत्या’ अशा आशयाची बातमी वाचली आणि चिल्ड्रेन एड्स सोसायटीत काम करून निवृत्त झालेल्या कै. माधवराव गोरे यांनी मतिमंद मुलांच्या पालकांना आवाहन केले. त्या आवाहनाला साद देत असोसिएशन ऑफ पेरेंट्स ऑफ मेंटली रिटायर्ड चिल्ड्रेन अर्थात ‘आधार’ या संस्थेची स्थापना झाली. पुढे यातूनच १७ जानेवारी १९९४ रोजी बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या ‘आधार’ या भिन्नमती मुलांच्या संगोपन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यात दिवालीबेन मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने बदलापूरजवळ जमीन घेण्यात सहकार्य झाले तर पालकांच्या निधीतून केंद्र उभे राहिले. सध्या दीड एकरचे हे केंद्र साडे पाच एकरात विस्तारित झाले आहे.

भिन्नमती मुलांसाठी देशभरात डे केअर अर्थात शाळेसारखे केंद्र उपलब्ध आहे. मात्र वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंतच त्यात मुलांना ठेवले जाते. त्यानंतर या मुलांना घरी राहण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरत नाही. ते अनेकदा कुटुंबीयांसाठी त्रासाचे ठरते. त्यातही तथाकथित सामाजिक नियम आणि शिस्त आड येत असल्याने अशा मुलांना अनेक कार्यक्रम आणि पाहुण्यांपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे भिन्नमती मुलांमध्ये अधिकची चिडचिड निर्माण होऊन ते आणखी खचतात. हाच मूळ प्रश्न समोर ठेवून आधार केंद्राची स्थापना झाली. मुळगावपासून जवळच असलेल्या वाडीत दीड एकरावर आधार केंद्र सुरू झाले. सध्या या केंद्रात २१८ मुलांचे संगोपन केले जाते.  मुलांसोबत मुलींचेही संगोपन येथे होते. आपल्या वैशिष्टय़पूर्ण उपचार पद्धतीतून मुलांना क्रियाशील ठेवण्यात आधार केंद्राला यश आले आहे. वयाच्या १९ वर्षांपासून ते ६८ वयापर्यंतची मुले आज केंद्रात आहेत. अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे येथील भिन्नमती मुलांच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळी मार्निंग वॉकपासून ते दिवसभरात काम करताना सुमधुर संगीत ऐकत काम करण्यापर्यंतचे साधम्र्य येथे पाहायला मिळते. कार्यशाळा हा महत्त्वाचा भाग या केंद्रात आहे. मुलांच्या बुद्धय़ांकानुसार आणि त्याच्या स्वभावानुसार येथे मुलांना कामाचे वाटप केले जाते. पणत्या बनवणे, कागदी पिशव्या तयार करणे, हातमाग आणि यंत्रावर कापड विणणे, रुमालावर नक्षीकाम करणे, कागदी पाकीट सजवणे, मेणबत्ती, अगरबत्ती पाकीटबंद करणे, लोकरीचे रुमाल तयार करणे अशी अनेक कामे मुले आणि मुलींकडून करून घेतली जातात. यात उत्पन्नापेक्षा मुलांचा वेळ सत्कारणी लागतो हे महत्त्वाचे आहे.

वैशिष्टय़पूर्ण संगोपन

आधार केंद्रात भिन्नमती मुलांचे केले जाणारे संगोपन वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळे मुलांचे आयुर्मान ४० ते ४५ वरून वाढून ६५ ते ७० झाले आहे. मुलांची देखरेख आणि दैनंदिन कार्य पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. ५० मुलांची विभागणी पाच गटात करून त्यांच्या बारीकसारीक गोष्टींची माहिती घेऊन ती समाजसेवकाला दिली जाते. त्यावरून मुलाचा अहवाल, प्रगतीचा आलेख टिपला जातो. भिन्नमती मुलांमध्ये चार प्रकार पाहायला मिळतात. माईल्ड, मॉडरेट, सिव्हीयर आणि प्रोफॉन्ड अशा प्रकारांत त्यांची विभागणी केली जाते. इतर ठिकाणी या चारही प्रकारांच्या मुलांना वेगवेगळे ठेवले जाते. मात्र आधार केंद्रात यातील तिघांची सरमिसळ करून एकमेकांकडून काहीतरी शिकण्याची, वागण्याची संधी मुलांना दिली जाते. यातून मुलांचा बौद्धिक विकास होऊन त्यांच्यात चांगल्या सवयी रुजल्या असल्याचे येथील निरीक्षक सांगतात. आधार केंद्रातील मुलांना तरण तलाव, उद्यान, विविध खेळ आणि समुपदेशन अशा गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे ते समाधानी राहतील अशी काळजी घेतली जाते.

संस्थेसमोरील आव्हाने

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या आणि रौप्यमहोत्सवी वर्षांत प्रवेश केलेल्या या संस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यात सर्वात मोठे आव्हान निधीचे आहे. सध्याच्या घडीला केंद्रात असलेल्या अनेक मुलांचे पालक हयात नाहीत. त्यामुळे त्यांचा खर्च निधीच्या माध्यमातून भागवला जातो. मात्र अनेकदा निधीही कमी पडत असल्याने संस्थेवर कर्ज होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले जाते. सध्या नाशिक येथेही संस्थेची दुसरी शाखा असून तीन वर्षांत येथे १०० मुले दाखल झाली आहेत. रौप्य महोत्सवी वर्षांत संस्थेतर्फे इतर संस्थांना प्रत्येक जिल्ह्य़ात असे केंद्र उभारण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. देशात दोन लाखांहून अधिक भिन्नमती मुले असून आधारसारख्या संस्था वाढायला हव्यात. त्यासाठी आधार सहकार्य करण्यासाठीही तयार आहे, असे संस्थेचे विश्वस्त सांगतात.