कल्याणातील अभिनव विद्या मंदिर शाळेच्या १९८३-८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे शाळा परिसरात नुकताच एकत्रीकरणाचा कार्यक्रम पार पडला. नोकरी, व्यवसायानिमित्त, लग्नानंतर परगावी स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या स्नेहसंमेलनाला उपस्थिती लावली.
शाळेची माजी विद्यार्थिनी असणाऱ्या आरती कोतवाल यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर शाळेतून १९८३-८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार केला. व्हॉट्सअ‍ॅपवरच स्नेहसंमेलन करायचे ठरले. शालेय शिक्षण झाल्यानंतर हे सर्व माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले नव्हते. त्यामुळेच शाळेच्या आवारातच स्नेहसंमेलन करण्याचे निश्चित झाले. यासाठी शाळेच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांंनी स्नेहसंमेलन भरविण्यासाठी पुढाकार घेतला. स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनीही उपस्थिती लावली. यामध्ये १९८३-८४ मध्ये शाळेचे मुख्याध्यापक असणारे प्रा. जाधव, वर्ग शिक्षीका प्रा. अ.अ. बापट, इंग्रजी विषय शिकवणाऱ्या प्रा. पुराणिक-सहस्रबुद्धे, मराठी विषण शिकविणाऱ्या प्रा. दिक्षीत, विज्ञान-भूमिती-बीजगणित शिकविणारे प्रा. हेमंत मोने, प्रा. वंजारी, प्रा. भालेराव, प्रा. भारंबे, प्रा. झुजम, प्रा. हरकरे या शिक्षक-शिक्षिकांनी उपस्थिती लावली. शिक्षक-विद्यार्थी एकत्रितपणे स्नेहसंमेलनात सहभागी झाल्याने शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकला. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी माजी विद्यार्थ्यांनी भेटायचे, असा मनाशी निश्चय करून ३१ वर्षांनी भरलेली ही शाळा सुटली.