लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : शहराच्या पूर्व भागात शासकीय रुग्णालय उभारणीच्या कामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूर्योदय गृहसंस्थेत रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे हस्तांतरण अंबरनाथ नगरपालिकेकडे करण्याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार कार्यालयास पत्राद्वारे गेल्या आठवडय़ात कळवण्यात आले होते. त्यानुसार अंबरनाथच्या तहसीलदारांनी सूर्योदय गृहसंस्थेच्या अध्यक्षांना हा भूखंड तातडीने हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र दिले आहे.

करोनाच्या काळात सार्वजनिक आरोग्य सुविधांची कमतरता स्पष्टपणे जाणवली. अंबरनाथसारख्या शहरात करोना नियंत्रणासाठी आरोग्य सुविधा निर्माण करताना पालिका, तहसील प्रशासनाची मोठी दमछाक झाली होती. त्यामुळे करोनाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांना शहराबाहेरच्या रुग्णालयांमध्ये नेण्याची वेळ आली होती. जून महिन्याच्या अखेरीस शहरात पहिले कोविड काळजी केंद्र उभारले गेले. करोनाच्या संकटाला येऊन नऊ  महिने उलटूनही शहरात पालिकेचे तीव्र लक्षणे असलेल्या आणि गंभीर रुग्णांसाठी कोविड रुग्णालय सुरू होऊ  शकलेले नाही. या काळात दोनच वर्षांपूर्वी पालिकेच्या ताब्यातून राज्य शासनाकडे हस्तांतरित केलेल्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. पुरेसे मनुष्यबळ, अद्ययावत यंत्रणा यामुळे छाया रुग्णालय अवघ्या काही गोष्टींसाठी वापरात राहिले. त्यामुळे शहरात नवे शासकीय रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीचा जोर वाढला.

जुलै महिन्यात आरोग्यमंत्र्यांनी आपल्या भेटीत याबाबतचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथच्या सूर्योदय सोसायटीत आरक्षित असलेल्या पावणेपाच एकर जागेवर नागरी खासगी भागिदारी तत्त्वावर रुग्णालय उभारण्याचे स्पष्ट केले होते. नुकतेच ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंबरनाथ तहसील कार्यालयाला याबाबत जागेची उपलब्धता करून देण्याबाबत कळवण्यात आले आहे.

त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेला मौजे कानसई येथील आरक्षण क्रमांक ११२ हा भूखंड अंबरनाथ नगरपालिकेला तात्काळ हस्तांतरित करण्याबाबत कळवले आहे.

त्यावर सूर्योदय सोसायटीच्या वतीने अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र पालिकेकडे नसलेली कोणतीही आरोग्य व्यवस्था आणि डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाच्या मर्यादा या धर्तीवर अंबरनाथ आणि आसपासच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय फायद्याचे ठरणार आहे.

रुग्णालयाच्या उभारणीसाठी भूखंड हस्तांतरण प्रक्रिया करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेला पत्राद्वारे भूखंड हस्तांतरणाच्या सूचना केल्या आहेत. त्यावर त्यांनी अंमल करून भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया करण्याची गरज आहे.- जयराज देशमुख, तहसीलदार, अंबरनाथ.

रुग्णालय व्हावे ही आमचीही इच्छा आहे. त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. मात्र शासकीय रुग्णालयांचा इतिहास सर्वश्रुत आहे. तरीही येत्या आठवडय़ात आमची संस्थेची बैठक असून त्यात हा विषय मांडून त्यावर निर्णय घेतला जाईल.- नरेंद्र काळे, सचिव, सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था.