सत्ताधारी आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कल्याण डोंबिवली शहराच्या बकाल अवस्थेकडे डोळे मिटून दुर्लक्ष करणाऱ्या शिवसेना पक्षनेतृत्वाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराची आठवण झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या या शहरांत नागरिकांची होत असलेली हेळसांड पाहण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथील दौरा केला. सीमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांची कामे  कित्येक महिन्यांपासून रखडली असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि डोंबिवलीतील आनंद बालभवन सुरू करण्याच्या सूचनाही केल्या. विशेष म्हणजे, दीड महिन्यांपूर्वी झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या अशाच दौऱ्यानंतरही शहरातील विकासकामे संथगतीनेच सुरू आहेत.
एकीकडे नागरी समस्यांमुळे हैराण झालेले मतदार आणि दुसरीकडे स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने लावलेला जोर या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आणि निकराची बनली आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या निवडणुकीपूर्वी कल्याण-डोंबिवलीकरांना दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्ती झाली आहे, याचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी शहराचा दौरा केला. अनेक भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण न झाल्याबद्दल त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. युवा सेनाप्रमुख नाराजी व्यक्त करत असल्याचे पाहून पक्षाच्या स्थानिक नेत्यांनाही चेव चढला आणि एरवी नागरी कामांतील ढिलाईकडे डोळेझाक करणारे हे नेते प्रकल्प अभियंत्यांवर बरसत असल्याचे चित्र गुरुवारी दिसले.   
पाहणीचा फायदा काय?
गेल्या दीड महिन्यात आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्यांदा कल्याण-डोंबिवली शहराचा दौरा केला. याआधी बदलापूरला कार्यक्रमाला जाताना भर उन्हात आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवली शहरातील सीमेंट रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. या दौऱ्याच्या आदल्या दिवशी महापालिकेतील सेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून ही रस्ते महिनाभरात पूर्ण करण्याची हमी घेतली होती. त्यावेळी त्यांना डिसेंबर-जानेवारी अखेर ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्ताने दिले होते. मात्र, गुरुवारी विकासकामांची अवस्थाही जैसे थे अशीच होती.

अडगळीत पडलेल्या बालभवनाचीही पाहणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोंबिवलीत बालभवन उभारणीचा ध्यास घेतला होता. तो त्यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आला. गेल्या चार वर्षांपूर्वी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बालभवनचे उद्घाटन केले. साडेचार वर्ष उलटली तरी हे बालभवन कोणत्या ठेकेदाराला चालवायला द्यायचे यावरून हा महत्त्वकांक्षी प्रकल्प अडगळीत पडला आहे. या अडगळीत पडलेल्या प्रकल्पाचीही आदित्य यांनी पाहणी केली.