आरोपीच्या जप्त मालमत्तेतून सव्वा कोटींचे वाटप; राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा

आकर्षक परताव्याच्या आशेने ठाण्यातील एका किराणा दुकानदाराच्या औषध व्यवसायात आयुष्यभराची कमाई गुंतवून नंतर फसगत झालेल्या ठाण्यातील गुंतवणूकदारांचा हक्काचे पैसे मिळवण्यासाठीचा संघर्ष अखेर १४ वर्षांनी संपुष्टात आला. या किराणा दुकानदाराच्या जप्त मालमत्तेची विक्री करून त्यातून मिळालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या रकमेचे वाटप १२८ पैकी ७० गुंतवणूकदारांना ठाणे विधी व सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले. आर्थिक घोटाळय़ातील गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा ठाणे जिल्हा प्रशासनाने केला आहे.

ठाण्याच्या जांभळीनाका परिसरात नारायणदास ठक्कर यांचे वडिलोपार्जित किराणा मालाचे मोठे दुकान होते. या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असायची. या ग्राहकांपैकी सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवानिवृत्तीच्या जवळपास आलेल्या व्यक्तींना नारायणदास आणि त्याचे वडील लक्ष्मीदास गाठायचे आणि त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैसा एका योजनेत गुंतविण्याचा सल्ला द्यायचे. ‘आम्ही औषधे बनवून त्याची आफ्रिकन देशात विक्री करतो आणि त्यातून आम्हाला भरपूर नफा होतो, अशी बतावणी दोघेजण करायचे. तसेच आमच्या व्यवसायात मुदत ठेवच्या स्वरूपात पैसे गुंतवा. महिन्याकाठी दीड ते दोन टक्के व्याज मिळवा, असे आमिषही त्यांनी दाखविले होते. त्याचप्रमाणे या व्यवसायासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनीत तुम्हाला भागीदार करून घेतो, अशा भूलथापाही दिल्या होत्या. जुनी ओळख असल्याने साडे तीनशेहून अधिक ग्राहकांनी त्यांच्या योजनेमध्ये ५० हजारांपासून ते १५ लाखांपर्यंत पैसे गुंतविले. काही महिने त्यांना ठरल्याप्रमाणे व्याज मिळाले. त्यानंतर मात्र त्यांना व्याजही नाही आणि मुदत ठेवही परत मिळाली नाही, अशी माहिती गुंतवणूकदार प्रतिनिधी रणजित चित्रे यांनी दिली.

गुजरातमधील मालमत्ता विकून पैसे परत करतो आणि त्यासाठी तो गुजरातमध्ये गेला असल्याचे त्याच्या कुटुंबीयाकडून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र तो घरातच लपून बसला होता. ही बाब कळल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी २००३ मध्ये पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदविली होती. साडेतीनशेपैकी १२८ गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे आले होते. त्यानुसार या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित देशमुख आणि तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संजीव जॉन यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून नारायणदास याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली होती. चार महिने कारागृहात असलेल्या नारायणदासला जामीन मिळत नव्हता म्हणून त्याने स्वत:ची मालमत्ता विक्री करून त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासंबंधीचा प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे दिले होते. त्याचाच फायदा गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी झाला आहे, असेही चित्रे यांनी सांगितले.

हा खटला महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ६ अन्वये (एमपीआयडी) विशेष न्यायालयापुढे चालविण्यात आला. जिल्हा व विशेष एमपीआयडी न्यायाधीश प्र.पु. जाधव यांनी २०१४मध्ये नारायणदास याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या मालमत्तेच्या लिलावातून सात कोटी ३६ लाख रुपये मिळाले होते.  ही रक्कम गुंतवणूकदारांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच केले होते. त्यानुसार बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयमध्ये आयोजित एका कार्यक्रमात १२८ पैकी ७० गुंतवणूकदारांना एकूण १ कोटी २५ लाख ९४ हजार ८४८ रुपये जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याशिवाय, उर्वरित गुंतवणूकदारांनाही त्यांचे पैसे परत मिळणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय?

  • ठाण्याच्या जांभळीनाका परिसरात नारायणदास ठक्कर यांचे वडिलोपार्जित किराणा मालाचे मोठे दुकान होते. या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असायची. या ग्राहकांपैकी सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवानिवृत्तीच्या जवळपास आलेल्या व्यक्तींना नारायणदास आणि त्याचे वडील लक्ष्मीदास गाठायचे आणि त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैसा एका योजनेत गुंतविण्याचा सल्ला द्यायचे.
  • जुनी ओळख असल्याने साडे तीनशेहून अधिक ग्राहकांनी त्यांच्या योजनेमध्ये ५० हजारांपासून ते १५ लाखांपर्यंत पैसे गुंतविले. काही महिने त्यांना ठरल्याप्रमाणे व्याज मिळाले. त्यानंतर मात्र त्यांना व्याजही नाही आणि मुदत ठेवही परत मिळाली नाही