‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर तत्परता

दिव्यातील हनुमान नगर परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे स्थानिकांना तीन दिवस विजेविना काढावे लागल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच हा बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून अपुरे मनुष्यबळ आणि अन्य कारणे देत महावितरणकडून या कामात टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे परिसरातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षाकाळात मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करावा लागत होता. ‘लोकसत्ता ठाणे’मधील वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ट्रान्सफॉर्मरचे काम तातडीने करण्यात आले.

हनुमान नगर येथील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने तो बदलण्याची गरज होती. मात्र, बिघाडाच्या ठिकाणी पोहोचण्याचा रस्ता अरुंद आहे. तसेच त्यासाठी जास्त मनुष्यबळ लागेल, असे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे काम तीन दिवसांपासून अर्धवट ठेवले होते. याचा सर्वाधिक फटका परिसरातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत होता. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी संपर्क साधल्यानंतर संबंधित वृत्त बुधवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. ते वाचून महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिघाड दुरुस्त करून हनुमान नगर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यथित झालेल्या शुभम वऱ्हाडकर याने ‘लोकसत्ता’कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. बुधवारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्याने ‘लोकसत्ता’चे आभार मानले. ‘लोकसत्ता’च्या बातमीमुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला असून विद्यार्थ्यांना यामुळे नक्कीच फायदा होऊ शकेल, असे त्याने सांगितले.