|| किशोर कोकणे

ठाण्यात झारखंडची टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज; पोलिसांकडून व्यापाऱ्यांच्या बैठका

ठाणे : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दुकाने आणि बाजारपेठा खुल्या झाल्या असून या ठिकाणी चोरीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. तसेच ठाण्यात एक झारखंडची बुरखाधारी टोळी सक्रिय झाल्याने अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच ठिकाणी व्यापाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये त्यांना संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना केल्या आहेत.

जून महिन्यात टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर जिल्ह््यातील दुकाने आणि बाजारपेठा सुरू झाल्या. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात ठप्प झालेली अर्थव्यवस्था आता पुन्हा रुळावर येऊ लागल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांवर दसरा आणि दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये नवीन मालाचा साठा ठेवण्यास सुरुवात केली आहे.असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच ठाण्यात एक झारखंडची टोळीही सक्रिय झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून यामुळे शहरात चोरीच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आधीच सावध करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी आणि सुरक्षाव्यवस्था कशी असावी, याची माहिती दिली. पोलिसांकडूनही आता गस्तीत वाढ केली जाणार आहे.

पोलिसांच्या सूचना

  •  दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
  •  रात्री दुकान बंद करून घरी जाताना कुणी पाठलाग करत तर नाही ना, याकडे लक्ष द्यावे.
  • नवीन कारागीर किंवा कामगार ठेवताना त्याचे फोटो, आधारकार्ड घेऊन पोलिसांकडे पडताळणी करावी.
  •  मान्यताप्राप्त कंपन्यांचे सुरक्षारक्षक ठेवावेत.
  •  दागिने मोड करण्यास आलेल्यांची सविस्तर माहिती ठेवावी.

चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी दरवर्षी व्यापाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जातात. तसेच टाळेबंदीनंतर शहरांमध्ये चोºयाची घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बैठका घेण्यात येत आहेत.

– अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस.