ठाणे ते डोंबिवलीदरम्यानच्या स्थानकांत रुग्णवाहिकेची उणीव

ठाणे आणि डोंबिवली दरम्यानच्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरसारख्या स्थानकांमध्ये अपघातात जखमी तसेच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा नसल्याने त्यांचे अतिशय हाल होत आहेत. गेल्या रविवारी दिवा-आगासन मार्गावर मृत्युमुखी पडलेल्या एका प्रवाशाला चक्क टेम्पोतून स्थानकापर्यंत न्यावे लागले.

दिवा-आगासन रेल्वेमार्गावर एका अज्ञात इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी खासगी रुग्णवाहिकेकडे मदतीची याचना केली. मात्र, रेल्वेकडून केवळ ७५० रुपये दिले जात असल्याचे सांगत खासगी रुग्णवाहिका चालकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. त्याच वेळी रस्त्यावरून मालाची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचालकाने मदतीचा हात दिला. या टेम्पोतून सदर व्यक्तीचा मृतदेह दिवा स्थानकात आणण्यात आला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्लीसारख्या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत होणाऱ्या अपघातग्रस्तांची रुग्णवाहिकेअभावी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी रेल्वेकडून एकही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यास उशीर होतो. त्यातून अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

दिवा रेल्वे स्थानकातून दररोज अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वे मार्ग ओलांडताना या ठिकाणी वारंवार अपघात होतात. हजारो प्रवासी दररोज फाटकातून ये-जा करीत रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. जानेवारी ते सप्टेंबर या काळात दिवा रेल्वे हद्दीमध्ये एकूण ६८ अपघात तर ७१ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या डब्यांवर होणारी दगडफेक, रेल्वेच्या धक्क्याने जखमी झालेले रुग्ण, रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना दिवा, आगासन, दातिवली यांसारख्या स्थानकांमधून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा कळवा येथील राजीव गांधी रुग्णालयात आणले जाते. मात्र जखमी रुग्ण तसेच मृतदेहांना आणण्यासाठी या ठिकाणी रुग्णवाहिका नसल्याने खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागतो. मात्र रेल्वेकडून तुटपुंजे पैसे दिले जात असल्याने खासगी रुग्णवाहिका चालकही आता रेल्वेसाठी काम करायला तयार होत नसल्याचे येथील प्रवाशांचे म्हणणे आहे.

फाटक बंद करण्याची मागणी

रेल्वे प्रशासनाकडून दिवा फाटक बंद करण्यासाठी उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असली तरी, महापालिकेच्या हद्दीमध्ये त्याची उतरण्याची जागा निश्चित नसल्यामुळे प्रकल्प रखडल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.  रेल्वे स्थानकातील उड्डाणपुलासाठी गेले दहा ते बारा वर्षांपासून नागरिकांकडून मागणी होत असतानाही या प्रकल्पाचे साधे रेखाचित्रही तयार करण्यात आले नसल्याचा दावा दिवा रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे.