05 March 2021

News Flash

रिक्षा तंदुरुस्त चाचणीसाठी नेरूळवारी

मीरा-भाईंदर शहरात अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  भाईंदरमधील ‘आरटीओ’चे शिबीर बंद

रस्त्यावरील अपघातांत सातत्याने वाढ होत असल्याने उच्च न्यायालयाने नियमांचे कडकपणे पालन करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहेत. याचा परिणाम म्हणून गेली अनेक वर्षे मीरा-भाईंदरमध्ये सुरू असलेले प्रादेशिक परिवहन विभागाचे शिबीर बंद झाले आहे. याचा फटका मीरा-भाईंदरमधील हजारो रिक्षाचालकांना बसला असून रिक्षा तंदुरुस्त चाचणीसाठी (पासिंग) रिक्षाचालकांना आता थेट नवी मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे.

मीरा-भाईंदर शहरात अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. या सर्व रिक्षांना दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तंदुरुस्तीची चाचणी द्यावी लागते. रिक्षाचालकांच्या सोयीसाठी काही वर्षांपासून प्रादेशिक परिवहन विभागाकडून मीरा-भाईंदरमध्ये आठवडय़ातून एक दिवस याप्रमाणे नियमितपणे शिबीर लावण्यात येत असे. वाहनांची चाचणी तसेच परवाने या शिबिरांद्वारे दिले जात होते. शिबिरामुळे ठाण्याला जायचा मोठा त्रास वाचत होता.

मध्यंतरी उच्च न्यायालयाने रस्त्यावर वाढत असलेल्या वाहनांची गंभीर दखल घेत वाहन चाचणीबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाला दिले. या नियमांचे पालन करणे शिबिरात शक्य होत नव्हते. नव्या नियमानुसार रिक्षांची चाचणी घेण्यासाठी २५० मीटर लांबीचा ट्रॅक असणे आवश्यक आहे. परंतु मीरा-भाईंदरमध्ये आयोजित केले जाणारे शिबीर हटकेश भागातील एका रिकाम्या जागी आयोजित केले जात होते आणि या ठिकाणी हा ट्रॅक आखणे शक्य नव्हते.

प्रादेशिक परिवहन विभागाने शिबिरासाठी महापालिकेकडे जागेची मागणी केली, परंतु जागा देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शवली. याचा परिणाम म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने मीरा-भाईंदरमधील शिबीर गुंडाळले. आता संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ासाठी नवी मुंबईतील नेरूळ या एकाच ठिकाणी वाहनांची चाचणी घेतली जाते. त्यामुळे रिक्षाचालकांना आपल्या रिक्षा नेरूळला घेऊन जाण्यावाचून पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

या ठिकाणी जिल्हातील शेकडो रिक्षा दररोज चाचणीसाठी येत असतात. न्यायालयाच्या निर्णयानुसार दररोज केवळ ८० वाहनांचीच चाचणी घेतली जाते. परंतु या ठिकाणी येणाऱ्या रिक्षांची संख्या प्रचंड असल्याने एकाच फेरीत चाचणीसाठी क्रमांक लागेल याची कोणतीही शाश्वती नसते. आपला क्रमांक लवकर लागावा यासाठी अनेक रिक्षाचालक पहाटे तीन वाजताच आपले घर सोडत  असतात, परंतु त्यानंतरही रिक्षेची चाचणी होईलच याची खात्री नसते. मुदतीत चाचणी झाली नाही तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते ती वेगळीच, अशा विचित्र कोंडीत रिक्षाचालक सापडले आहेत.

याप्रकरणी मीरा-भाईंदर महापालिकेने पुढाकार घ्यावा आणि प्रादेशिक परिवहन विभागाला शिबिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘रिक्षा चालक-मालक युनियन’ने महापालिकेकडे केली आहे. मीरा-भाईंदरमध्ये शिबीर सुरू झाल्यास रिक्षाचालकांची मोठय़ा त्रासातून सुटका होणार आहे.

आर्थिक नुकसान

मीरा-भाईंदर ते नेरूळ हे अंतर सुमारे ८५ किलोमीटर आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा संपूर्ण दिवस यात खर्ची होतोच, शिवाय आर्थिक भरूदडही बसतो. त्यातच सध्या या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने समस्येत आणखी भर पडत आहे. यात दलालांचे मात्र चांगलेच फावले आहे. काही हजार रुपये मोजले तर पहिल्याच फेरीत रिक्षेचा चाचणीसाठी क्रमांक लावून देण्याचे आमिष दलालांकडून दिले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:19 am

Web Title: after the high court order the rto camp closed in bhayander
Next Stories
1 कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे आंदोलन
2 शहरबात : शिवसेनेचे  सामाजिक अभिसरण
3 गणेशमूर्तीच्या किमती वाढल्या
Just Now!
X