|| कल्पेश भोईर

सर्व शहरे जोडली जाणार, वाहतुकीच्या वेळेची बचत होणार :– वसई विरार महापालिकेच्या सर्व शहरे आणि गावांना जोडणाऱ्या रिंग रूट अर्थात बाह्य़वळण रस्ता प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अडीच हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे वसईतील सर्व शहरे एकाच रस्त्याने जोडली जाऊन वाहतुकीच्या वेळेची बचत होणार आहे.

वसई विरार महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी रिंग रूट अर्थात बाह्य़वळण रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. वसई विरारमधील ४ शहरे आणि २२ गावांना एकाच रस्त्याने जोडणारा हा प्रकल्प असून त्यासाठी ४० मीटरचा रुंदीचा आणि ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या संदर्भातील संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी लागणारी जागा व त्या जागेच्या सव्‍‌र्हेचे काम पूर्ण झाले आहे, असे पालिकेने सांगितले आहे.

जी २१ गावे पालिकेतून वगळण्यात आली आहेत त्याचे विशेष नियोजन प्राधिकरण अधिकार सन २०१५ सालापासून पालिकेकडे देण्यात आले आहेत. त्यातीलच विरार येथील गाव मौजे कोल्हापूर या गावाचा समावेश आहे.

या मार्गाचा वसई विरार उपप्रदेशाच्या मंजूर विकास आराखडय़ामध्ये अंतर्भूत  करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) नुसार प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात आला होता. या वेळी यावर चर्चा होऊन अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

रिंग रूट करायचा झाल्यास त्यासाठी खासगी-सरकारी तसेच मीठ व वन विभागाच्या जमिनी ताब्यात घ्यावा लागणार आहेत. त्यासाठीचा सविस्तर अहवाल पालिकेने तयार केला आहे. ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यासाठी जागा ताब्यात आल्या आहेत त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. हा रस्ता झाल्यास भविष्यात वाहतुकीच्या दृष्टीने तो मोठा फायदेशीर ठरणार आहे, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. रिंग रूट प्रकल्पाचा खर्च अडीच हजार कोटी रुपये एवढा आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.  यासाठी अंदाजे ६० टक्के खासगी जागा पालिकेला संपादित कराव्या लागणार आहेत.

काय आहे रिंग रूट

रिंग रूट म्हणजे बाह्य़वळण रस्ता. वसई विरार महापालिकेच्या विकास आराखडय़ात विरार, नालासोपारा, वसई, नवघर-माणिकपूर यांना जोडणारा, २२ गावांमधून जाणारा रिंग रोड दर्शविण्यात आला आहे.

४० मीटर रुंदीचा हा रस्ता असून त्याची एकूण लांबी ३८ किलोमीटर इतकी आहे. वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रामधील चारही शहरांना जोडणारा ४० मीटर रुंदीच्या प्रस्तावित रिंग रूट रस्त्यावरील भूसंपादन करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे.

रिंग रूट तयार करण्यासाठी भूसंपादनाचे सर्वेक्षण केलेले आहे तसेच पाणथळ जागा आणि सागरी नियंत्रण क्षेत्रामध्ये किती याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. – वाय. एस. रेड्डी, नगररचना विभाग महापालिका